ऐतिहासिक नकटय़ा रवळय़ाची विहीर पुरातत्त्व खात्याच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली आल्यानंतर या विहिरीची दुरवस्था, अतिक्रमणं अन् घाणीच्या साम्राज्यातून मुक्तता होऊन त्यास गतवैभव प्राप्त होईल अशी वास्तुप्रेमींनी रंगवलेली कल्पना केवळ कल्पनाच ठरली आहे. सध्या या विहिरीची डागडुजी उत्तम असली, तरी विहीर परिसराला साधे तारेचे कुंपणही नाही, देखभालीची यंत्रणा अधांतरी आहे. तर, घाणीचे साम्राज्य असल्याने हा परिसर उदास व भकास दिसत आहे.
पूर्वीपासून या विहिरीकडे संबंधित पुरातत्त्व खात्याने कधी लक्षच दिले नव्हते. यावर सुमारे ८ वर्षांपूर्वी तत्कालीन खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रथम १२ डिसेंबर २००५ रोजी या विहिरीच्या गतवैभवासाठी लेखी पत्र देऊन प्रयत्न केले. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर पुरातत्त्व खात्याचे महानिर्देशक सी. बाबू राजीव यांनी या ऐतिहासिक ठेव्याला गतवैभव प्राप्त करून, त्याचे जतन होण्याकामी स्पष्ट निर्देश दिले. ‘पंताचा गोट, स्टेप वेल’ म्हणून पुरातत्त्व खात्याच्या दप्तरी नोंद असलेल्या या ऐतिहासिक वास्तूची डागडुजी होऊन त्या भोवतीचा अतिक्रमणाचा विळखा, घाणीचे साम्राज्य नाहीसे होईल आणि कराडचे हे एक आकर्षण ठरेल अशा यामुळेआशा पल्लवित झाल्या. यानंतर विहिरीची डागडुजी होताना, येथे पहारा देणाऱ्या व्यक्तीची नेमणूकही झाली. मात्र, हा पहारेकरी त्याच्या कलेनेच येथे काम करीत राहिला. तर, विहिरीच्या भोवतीकचऱ्याचे साम्राज्य पसरले. आजवर या परिसराला साधे तारेचेही कुंपण न झाल्याने अतिक्रमणाचा प्रश्न गुलदस्त्यातच असावा असा अंदाज बांधला जात आहे.
औंध संस्थांनची मूळ राजधानी असलेल्या इथल्या सोमवार पेठ पंताच्या कोटातील महाकाय नकटय़ा रवळय़ाच्या विहिरीकडे वास्तुकलेचा अनोखा आविष्कार म्हणून पाहिले जाते. पुरातन आख्यायिकेत नकटय़ा रवळय़ा या राक्षसाचा मनाचा थरकाप उडवून देणारा पराक्रम व तो नित्याने स्नान करीत असलेले तसेच, वास्तव्य असलेले हे ठिकाण याचे किस्से मुलांना कुटुंबातील वडीलधारे लोक एखाद्या गोष्टीची भीती राहावी, म्हणून सांगतात.