केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (रविवार) सिंधुदुर्ग येथील भाजपा नेते नारायण राणे यांच्या लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी शिवसेना व महाविकासआघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ”शिवसेनेने सत्तेच्या मोहात बाळासाहेब ठाकरे यांच्या सिद्धांतांना नदीत सोडले, आम्ही जर तसं वागलो असतो तर आज शिवसेनाच उरली नसती.” असं अमित शाह यांनी यावेळी म्हटलं. यावर आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा देखील उल्लेख केला आहे.

“१९७५ मध्ये रजनी पटेल आणि ९० च्या दशकात (मला वाटतं मुरली देवरा) म्हणाले होते की शिवसेना संपेल. पुन्हा २०१२ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील असंच म्हटलं होतं आणि दोन्ही वेळी शिवसेना पूर्वीपेक्षा अधिक ताकदीनिशी पुढे आली. जय महाराष्ट्र..!” अशा शब्दांमध्ये ट्विट करून शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक प्रकारे गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्यावरच प्रतिक्रिया दिल्याचं दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर सत्ता वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून नाराज होत शिवसेनेनं भाजपासोबत युती तोडत काँग्रेस व राष्ट्रवादीशी आघाडी केली. भाजपानं मुख्यमंत्रीपदासह सत्ता वाटपात ५०-५० स्थान देण्याचं वचन दिलं होतं, असा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. बंद दाराआड झालेल्या बैठकीतील वचनावर भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री यांनी मौन आज सोडलं. कोणतंही वचन दिलं नसल्याचं ठणकावून सांगत अमित शाह यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीतील मित्र पक्षांवर घणाघाती टीका केली.

…तर आज शिवसेनाच उरली नसती; अमित शाह यांचा घणाघात

यावेळी शाह यांनी शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या आरोपाचा समाचार घेतला. “मी भाजपाध्यक्ष असताना महाराष्ट्रात निवडणुका झाल्या होत्या. आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो होतो. पण, त्यानंतर तीन चाकी रिक्षाचं सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात आलं. तिन्ही चाकं वेगवेगळ्या दिशेनं चालतात. हे सरकार प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरलं आहे. मी आज महाराष्ट्रातील जनतेला सांगण्यासाठी आलो आहे. तुम्ही जो जनादेश दिला होता, त्याचा अपमान करून सत्तेच्या लालसेपोटी इथे सरकार स्थापन करण्यात आलं. मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-शिवसेनेच्या सरकारसाठी जनादेश होता. जे म्हणत आहेत की आम्ही वचन तोडलं. त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की आम्ही वचनावर ठाम राहणारी माणसं आहोत. अशा प्रकारचं खोटं आम्ही बोलत नाही. बिहारमध्ये आम्ही निवडणूक लढलो. आम्ही वचन दिलं होतं की एनडीएचं सरकार आलं, तर मुख्यमंत्री नितीश कुमार होणार. आमच्या जागा जास्त येऊनही आम्ही नितीश कुमारांना मुख्यमंत्री केलं,” अशा शब्दात अमित शाह यांनी शिवसेनेला उत्तर दिलं.