दहा वर्षे भूमिगत माओवाद्याविरुद्ध कारवाई

मुंबई : आंध्र प्रदेश पोलिसांना गेल्या दहा वर्षांपासून हव्या असलेल्या कट्टर माओवाद्याला अटक केल्यामुळे राज्याचे दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आठ लाख रुपयांच्या पारितोषिकाचे मानकरी ठरले आहे. ‘एटीएस’चे तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी आणि उपायुक्त डॉ. मोहनकुमार दहिकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली होती.

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या दहशतवादी संघटनेचे काही सदस्य नक्षलवादी चळवळीचा प्रसार करणे आणि आर्थिक पाठबळ मिळविण्याकरिता मुंबईत असल्याची गोपनीय माहिती राज्याच्या एटीएसला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीएसने पूर्व उपनगरातून सात माओवाद्यांना अटक केली. या माओवाद्यांच्या चौकशीतून त्यांचा नेता कृष्णा लिंगय्या घोक्ष ऊर्फ वेणूगोपालन असल्याची माहिती मिळाली होती. त्यालाही एटीएस पथकाने शिताफीने अटक केली. त्यावेळी चौकशीत तोच नव्हे तर अटक केलेले सातही जण माओवाद्यांच्या ‘गोल्डन कॉरिडॉर समिती’चे कट्टर सदस्य असल्याचे स्पष्ट झाले. सुरत ते मुंबईपर्यंतच्या औद्योगिक परिसरात नक्षलवादी चळवळीचा प्रसार करणे आणि या चळवळीसाठी निधी उभारण्याची महत्त्वाची जबाबदारी वेणूगोपालन याच्यावर होती. तो दहा वर्षांपासून भूमिगत होता. त्याच्या अटकेसाठी आंध्र प्रदेश सरकारने आठ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर केले होते. या सर्वाना ‘विघातक कारवाया प्रतिबंधक कारवाया’नुसार अटक करण्यात आली आहे.

राज्याच्या एटीएसने ही कारवाई केल्यानंतर आंध्र प्रदेश सरकारने प्रशस्तीपत्रक आणि आठ लाखांचा पारितोषिकाचा धनादेश राज्याच्या पोलीस महासंचालकांना पाठविला आहे. त्यानुसार आता उपायुक्त डॉ. मोहनकुमार दहिकर व साहाय्यक आयुक्त सुनील वाडके, साहाय्यक निरीक्षक दशरथ विटकर, उपनिरीक्षक विक्रम पाटील (प्रत्येकी ७५ हजार रुपये), निरीक्षक संजय मराठे, भास्कर कदम आणि संतोष सावंत (एक लाख रुपये) आणि अरुण देशमुख, अरविंद मोरे, शहाजी सोनावणे आणि राजेंद्र खरात (प्रत्येकी ५० हजार रुपये) या पोलिसांना रोख पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.