अकोला महापालिकेची आर्थिक स्थिती एकीकडे भक्कम नाही, असे सांगण्यात येते, तर दुसरीकडे इतर कामांवर खूप पैसा खर्च करण्यात येत आहे. मनपाकडे निधीच्या रूपात बराच पैसा आहे, पण मनपातील शाळांमध्ये शिकविणाऱ्या ३०१ शिक्षकांना गेल्या सात महिन्यांपासून वेतन मिळाले नाही, तसेच त्यांच्या भविष्य निर्वाह निधीतही प्रशासनाने पैसा भरलेला नाही म्हणून सर्व शिक्षक आता विविध आंदोलने करणार आहेत.
उद्या, १० डिसेंबरला मनपा अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरीने स्वागत करण्यात येईल, तर ११ डिसेंबरला दुपारी ४ ते ६ या वेळेत काळ्याफिती लावून शिक्षक कामे करतील. १२ डिसेंबरला मनपाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन, तर १५ डिसेंबरला मनपा आयुक्तांना घेराव, १६ ला घंटानाद आणि १७ व १८ रोजी मनपाच्या निलाजरेपणावर पथनाटय़ सादर केले जाणार आहे. १९ ला सायंकाळी ४ ते ६ या काळात साखळी उपोषण हे शिक्षक करणार आहेत. या आंदोलनात उर्दू शिक्षक संघटना, शिक्षक भारती संघटना, शिक्षक सेना संघटना व पुरोगामी उर्दू शिक्षक समिती भाग घेणार आहेत, असे सरदार खान, कैलास नागे, संजय शिरेकर व इरफान रहेमान यांनी सांगितले.
मे २०१४ पासून आता नोव्हेंबर उगवला तरी मनपा शिक्षकांना वेतन मिळालेले नाही, तसेच आपल्या भविष्य निर्वाह निधी खात्यातून कर्ज काढावे म्हणून काही शिक्षकांनी त्या कार्यालयात अर्ज केल्यावर तुमच्या खात्यात मनपाने पैसेच भरलेले नसल्याने तुम्हाला कर्ज देता येणार नाही, असे सांगण्यात आले. मनपा कडून वेतनही मिळत नाही व भविष्य निर्वाह निधी कार्यालयातून कर्जही मिळत नाही, अशी शिक्षकांची स्थिती झाल्याने वेतन मिळावे व आपल्या भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्यात यावा, अशी या शिक्षकांची मागणी आहे. असे न केल्यास त्या खात्याच्या आयुक्तांनी पोलिसांकडे तशी तक्रार दिल्यास मनपा आयुक्तांवर फौजदारी कारवाई होऊ शकते. मनपा प्रशासन शिक्षकांच्या समस्यांकडे लक्ष देत नसल्याने आता शिक्षकांनी विविध आंदोलने करण्याचा कार्यक्रमच जाहीर केला आहे.