News Flash

“निदान सावरकर परजीवी किंवा आंदोलनजीवी होते असं म्हणू नका”

संजय राऊतांचा पंतप्रधानांवर मोदींवर निशाणा

संग्रहित छायाचित्र

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावर उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात आंदोलनजीवी निर्माण झाल्याचं म्हटलं होतं. पंतप्रधानांच्या या विधानावर उलट सुलट प्रतिक्रिया उमटल्या. उमटत आहेत. शेतकरी आंदोलनाविषयी पंतप्रधानांनी केलेल्या विधानावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे. “काश्मिरातून ३७० कलम हटवणे हे भाजपाच्या जीवनातले सगळ्यात मोठे आंदोलन होते. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्यासाठी आंदोलन केले व बलिदानही दिले. मुखर्जी यांचे बलिदानही आता ‘आंदोलनजीवी’ ठरवले गेले,” अशी खंत व्यक्त करत राऊत यांनी पंतप्रधानांना टोला लगावला आहे.

संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून पंतप्रधानांनी शेतकरी आंदोलनाविषयी केलेल्या आंदोलनजीवी शब्दावरून टीका केली आहे. “ज्या लोकशाहीतले रस्ते सुनसान असतात त्या देशाची संसद मृतप्राय होते, असे एक विधान राम मनोहर लोहिया यांनी केल्याचे आठवते. आज लोहियांचे बोल खरे होताना दिसत आहेत. संसद दिवसेंदिवस मृतप्राय होत आहे. कारण रस्ते सुनसान व्हावेत असे फर्मान पंतप्रधान मोदी यांनी काढले आहे. देशातील आंदोलने थांबवा. आंदोलने म्हणजे परकीय शक्तीचा कट. काही लोक फक्त आंदोलनांवरच जगत आहेत. ‘आंदोलनजीवी’ असा उल्लेख करून पंतप्रधानांनी रस्त्यावर उतरणाऱ्या कार्यकर्त्यांची थट्टा केली आहे. ही थट्टा फक्त गाझीपूरला तीन महिन्यांपासून कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची नाही, तर देशाचे स्वातंत्र्य आणि लोकशाहीचे मूल्य राखण्यासाठी दीडशे वर्षांपासून आंदोलन करणाऱ्या प्रत्येकाची थट्टा आहे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

“गाझीपूरमधील शेतकऱ्यांचं आंदोलन म्हणजे ‘तमाशा’ असे भाजपाचे महाराष्ट्रातील शेतकरी पुढारी पाशा पटेल यांनी बोलावे हे धक्कादायक. न्या. महादेव गोविंद रानडे यांनी एके ठिकाणी म्हटले आहे, ‘जेथे लोकांच्या म्हणण्याला मान मिळतो तो देश स्वतंत्र. जेथे नाही तो परतंत्र.’ त्या अर्थाने आज येथे कोणी स्वतंत्र आहे काय? सत्याग्रह हा हिंदुस्थानने जगापुढे ठेवलेला बंदुकीला वैशिष्टय़पूर्ण पर्याय असल्याचे राम मनोहर लोहियांनी सांगितले. त्या लोहियांचा पुतळाही संसद भवनात आहे. जयप्रकाश नारायण यांनी आणीबाणीविरुद्ध दुसऱया स्वातंत्र्याचा लढा पुकारला. त्याच आंदोलनाने इंदिरा गांधींची सत्ता उलथवून टाकली. हे आंदोलन परजीवी होते काय? कारण त्याआधी इंदिरा गांधी सातत्याने आदळआपट करीत होत्या की परकीय शक्ती देश अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मोदी यांचा ‘परजीवी’ सिद्धांत स्वीकारला तर इंदिरा गांधींचे ते सांगणे खरेच होते. पुढे इंदिरा गांधी व राजीव गांधी यांचे खून त्याच परकीय शक्तीने केले असे आरोप झाले,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

“गोध्राकांड काय होते?”

“पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहा हे आज ‘आंदोलना’ची खिल्ली उडवत आहेत; पण साबरमती एक्प्रेस जाळल्यावर जे भयंकर गोध्राकांड झाले, त्यातूनच मोदी हे हिंदू समाजाचे नवे मसिहा बनले. मोदी यांच्या दृष्टीने गोध्राकांड हे उत्स्फूर्त आंदोलनच होते. हे आंदोलन ‘परजीवी’ आहे असे तेव्हाचे पंतप्रधान वाजपेयी यांनी म्हटलेले नाही. त्याच ‘गोध्राकांड’ आंदोलनाने मोदी व शहा यांना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचविले. त्या मानाने दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचे आंदोलन शांत आणि सौम्य आहे. शिस्त पाळून आहे. हे आंदोलन ‘कॉर्पोरेट व्यवस्था’ आणि भांडवलदारांच्या विरोधात असल्यामुळे शेतकरी बदनाम केला जात आहे. ज्यांना आज शेतकऱयांचे आंदोलन नको आहे त्यांनी स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास तपासायला हवा. देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात शेतकरी मोठ्या प्रमाणावर उतरला होता. गुजरातमध्ये वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभा केला आहे. ब्रिटिशांच्या विरोधात साराबंदी, बार्डोली सत्याग्रह शेतकऱयांनी केला व त्याचे नेतृत्व वल्लभभाई पटेलांनी केले. पटेलांचे फक्त पुतळे निर्माण करून काय होणार? महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सगळ्यात मोठे ‘आंदोलनजीवी’ होते. कायदेभंग, परदेशी कापडाची होळी, चले जाव, मिठाचा सत्याग्रह अशा अनेक आंदोलनांनी गांधीजींनी देश एका झेंड्याखाली एकवटवला, एकजिनसी केला. गांधीजींची उपोषणे हेसुद्धा आंदोलनच होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचे आंदोलन केले. अस्पृश्यांच्या अस्मितेसाठी लढा दिला. ते आंदोलन नव्हते तर दुसरे काय होते? संसदेच्या आवारात अनेक पुतळे विराजमान आहेत. त्या प्रत्येक पुतळ्याला आंदोलनाचा इतिहास आहे. तो प्रत्येक पुतळा आता जिवंत होऊन सांगत आहे, ‘आम्ही आंदोलने केली म्हणून तुम्ही सिंहासनावर बसला आहात.’ संसदेच्या आवारात
महात्मा फुलेंचा पुतळा संसदेच्या आवारात आहे. स्त्री शिक्षण, शेतकऱयांच्या प्रश्नांवर आंदोलनाची ठिणगी टाकणारे फुलेच होते. फुले जातीभेदाविरुद्ध लढले. आपल्या वाड्यातील विहीर त्यांनी त्या काळात अस्पृश्यांसाठी खुली केली. हे आंदोलनही मग ‘परजीवी’ वगैरे म्हणायचे काय?,” असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

“स्वातंत्र्याच्या आंदोलनात भाजपा कुठेच नव्हता?”

“पंजाबात लाला लजपत राय हे शेतकऱयांचे नेते होते. ब्रिटिश लाठीमारात ते मरण पावले. महाराष्ट्रात वसंतदादा पाटील, किसन वीर, नाना पाटील ही शेतकऱयांची पोरेच लढा देत होती. प. बंगालात राजा राममोहन रॉय यांनी सामाजिक सुधारणांसाठी लढा दिला. सतीची चाल बंद करावी लागली. हे आंदोलनच होते. दिल्लीत निर्भया बलात्कार प्रकरण घडले तेव्हा दिल्लीच्या रस्त्यांवर आणि संसदेत आंदोलन करणारे भाजपाचेच लोक होते. आता एखाद्या निर्भयावर अत्याचार झाला तर ‘हाथरस’प्रमाणे तिला अंधारात पोलीस गुपचूप जाळून टाकतील व त्या घटनेचे वार्तांकन करणाऱ्यांना देशद्रोही ठरवतील. अयोध्येत रामाचे मंदिर उभे राहात आहे ते शेकडो करसेवकांच्या बलिदानातून. हे सर्व हुतात्मे परकीय हस्तक किंवा परजीवीच होते, असेच आता म्हणावे लागेल. एकेकाळी काँग्रेस पक्ष हेच एक आंदोलन होते. आज काँग्रेस कुठे आहे? काँग्रेसचा इतिहास जितका आंदोलनाचा आणि संघर्षाचा आहे तितका तर भाजपाचा नाही. स्वातंत्र्याच्या आंदोलनांत भाजपा कुठेच नव्हता. वीर सावरकर यांचे स्वातंत्र्याचे आंदोलन सशस्त्र होते व त्याबद्दल त्यांना इंग्रज सरकारने ५० वर्षांच्या काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली. अंदमानातून सुटल्यावर सावरकरांनी अस्पृश्यता निर्मूलन, भाषाशुद्धीसारखी आंदोलने केली. वीर सावरकरांना भारतरत्न करण्यात आले नाही. निदान सावरकर परजीवी किंवा आंदोलनजीवी होते असे म्हणू नका. भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत जी आंदोलने केली त्यांना काय म्हणावे? भारतीय जनता पक्षाची सर्व आंदोलने झाली. ती मग फक्त राजकीय हितासाठी व सत्ताप्राप्तीसाठीच झाली असे म्हणावे लागेल. कश्मीरातून ३७० कलम हटवणे हे भाजपाच्या जीवनातले सगळ्यात मोठे आंदोलन होते. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी त्यासाठी आंदोलन केले व बलिदानही दिले. मुखर्जी यांचे बलिदानही आता ‘आंदोलनजीवी’ ठरवले गेले. क्रांतिकारक सत्तेवर येताच सगळ्यात आधी क्रांतीच्या पिलांचा बळी घेतो. आपल्या देशात हेच सुरू आहे काय?,” असं म्हणत राऊत यांनी मोदी यांना सुनावलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2021 9:27 am

Web Title: andolan jeevi pm narendra modi sanjay raut criticised savarkar bmh 90
Next Stories
1 समुद्रात जाणाऱ्या बाजची रेल्वे उड्डाणपुलाला धडक
2 शेतीच्या वादातून भाऊ, जावयाचा खून
3 फिरत्या पशुचिकित्सालयाचा सर्वाधिक लाभ पुणे जिल्हा विभागाला
Just Now!
X