21 January 2019

News Flash

ज्ञानाचा खजिना पाहणे आता अधिक सुलभ

‘बुकगंगा डॉट कॉम’ या ग्रंथक्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने हे ‘अ‍ॅप’ तयार केले आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

‘मराठी विश्वकोश’ ‘अ‍ॅप’चे लोकार्पण

मराठी विश्वकोश आता ‘मोबाइल अ‍ॅप’वर उपलब्ध झाला आहे. वाईमध्ये मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांच्या हस्ते ‘मराठी विश्वकोश’ नावाच्या या ‘अ‍ॅप’चे आज लोकर्पण झाले. यामुळे मराठी भाषेतील हा ज्ञानाचा खजिना आता जगभरातील अभ्यासकांना अधिक सुलभतेने खुला होणार आहे.

भल्या मोठय़ा आकार-वजनाचे विश्वकोश ग्रंथ पाहूनच हा अवघड विषय असावा आणि तो आपल्यासाठी नाही असेच अनेकांना वाटत असे. प्रचंड मोठा आकार आणि वजन आणि पुन्हा असे तब्बल २० खंड सांभाळणे, हाताळणे, त्यातील माहितीचा शोध घेणे हे सारेच जिकिरीचे होते. तंत्रज्ञानात जसजसे बदल होत गेले तसे हे मराठीतील हे धन नवनव्या माध्यमातून वाचकांपुढे येत गेले. सुरुवातीला संगणकावर, नंतर ‘सी डॅक’च्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर हे कोश उपलब्ध झाले. पुढे या सर्व खंडांच्या ‘सीडी’ निघाल्या. पुढे हे मोठाले ग्रंथ ‘पेन ड्राइव्ह’वर देखील आले. या पुढच्या पिढीचा विचार करत आता हे सर्व ज्ञानाचे भांडार केवळ एका ‘मोबाइल अ‍ॅप’वर पाहण्याची सुविधा निर्माण केली आहे.

‘बुकगंगा डॉट कॉम’ या ग्रंथक्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने हे ‘अ‍ॅप’ तयार केले आहे. या ‘अ‍ॅप’चे लोकार्पण आज विश्वकोश महामंडळाचे अध्यक्ष दिलीप करंबेळकर यांच्या हस्ते झाले. ‘मराठी विश्वकोश’ या नावाचे हे ‘अ‍ॅप’ ‘गुगल प्ले स्टोअर’वरून वाचकांना विनामूल्य ‘डाऊनलोड’ करता येणार आहे. या नव्या तंत्रामुळे विश्वकोशाचे वीस खंड, १५१ विषय, ३१२ सूची, १८ हजार १६३ लेख असलेले हे ज्ञानभांडार आता केवळ मोबाइलवर लोकांना सहज उपलब्ध होणार आहे.  विषय, शीर्षक, खंड आदीनुसार या माहितीचा शोध घेता येणार आहे.

हा खजिना मराठी वाचकांबरोबरच मराठी भाषेवर काम करणाऱ्या जगभरातील अभ्यासकांना उपयुक्त पडेल. ‘अँड्रॉइड’, ‘आय फोन झिंगल’ या प्रमुख मोबाइल प्रणालीमध्ये हे ‘अ‍ॅप’ वापरता येणे शक्य आहे. या ‘अ‍ॅप’वर विश्वकोशाच्या सगळय़ा नोंदी बघता येऊ शकतात. जिथे ‘इंटरनेट’ सुविधा आहे अशा जगातल्या कोठूनही आपण आता विश्वकोश बघू शकतो.

मराठी विश्वकोशाचे समृद्ध ग्रंथभांडार हे त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांच्या अपार मेहनतीने तयार झाले आहे. इथल्या नोंदी विद्वानांकडून पुन:पुन्हा तपासून घेतलेल्या आहेत. त्याला माहितीची अधिग्राहय़ता मिळाल्याने नोंदींना प्राथमिक संदर्भमूल्य आहे. नेमक्या आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने हे लेखन झालेले आहे. हा मराठी भाषेचा मोठा वारसा असून आता या ‘अ‍ॅप’च्या रूपाने तो जगभरातील वाचक, अभ्यासकांसमोर येत आहे.

वाचक, अभ्यासकांना फायदा

विश्वकोशाच्या वीस खंडांमध्ये प्रयत्नपूर्वक जी माहिती संकलित आणि संपादित केली आहे ती कोणाही व्यक्तीला सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी हे ‘अ‍ॅप’ बनवले आहे. याचा वाचक, अभ्यासकांना मोठा फायदा होईल. हे ‘अ‍ॅप’ बुकगंगा संस्थेने सामाजिक जाणिवेतून विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे.

– दिलीप करंबेळकर,

अध्यक्ष, प्रमुख संपादक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ.

 

‘ऑडिओ बुक’साठी प्रयत्न

सध्या मराठी वाचन कमी होत असून इंग्रजी माध्यमाचा प्रभाव मोठय़ा प्रमाणात वाढतो आहे. अशा वेळी मराठी भाषेतील हा ज्ञानाचा खजिना नव्या पिढीला त्यांच्या माध्यमात उपलब्ध व्हावा यासाठी हे ‘अ‍ॅप’ तयार केले आहे. यापुढे ‘ऑडिओ बुक’ स्वरूपात हे कोश उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. बुकगंगा त्या दृष्टीने प्रयत्न करत आहे.

– मंदार जोगळेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, बुकगंगा डॉट कॉम

First Published on January 13, 2018 3:37 am

Web Title: android apps for marathi vishwakosh