News Flash

आंगणेवाडी भराडी मातेच्या दर्शनासाठी जनसागर

आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेचे दर्शन लाखो भाविकांनी घेतले.

आंगणेवाडी भराडी माता

आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेचे दर्शन लाखो भाविकांनी घेतले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री दीपक केसरकर आदी राजकीय नेत्यांनीदेखील दर्शनासाठी गर्दी केली होती.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आंगणेवाडी देवीच्या दर्शनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात अगोदर दोन दिवस दाखल झाले. त्यांनी, मोदी सरकारकडून अपेक्षा होत्या पण अपेक्षाभंग झाल्याचे म्हटले आहे. गुजराथ मॉडेल पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामावर भारावून गेलो होतो, पण पंतप्रधान झाल्यावर त्यांनी काहीच केले नाही. जनतेप्रमाणे माझीदेखील घोर निराशा झाली असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
सिंधुदुर्गचा पर्यटन विकास फक्त नेत्यांची हॉटेल्स उभारण्यापुरताच मर्यादित राहिला आहे. सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासात पायाभूत सुविधा नाहीत, तसेच अनेक वर्षांच्या त्याच समस्या ऐकतो आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी लोकांना आणखी किती काळ फसविणार आहे असे सांगत राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका, केंद्र व राज्य सरकारचा योग्य वेळी पर्दापाश करणार असल्याचे सांगितले.
राज ठाकरे यांनी सकाळीच आंगणेवाडीच्या श्रीदेवी भराडी मातेचे दर्शन घेतले. त्यांच्यासोबत सुपुत्र अमित ठाकरे, राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर, आदित्य शिरोडकर व मनसे पदाधिकारीदेखील होते.
शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी देवीचे दर्शन घेतले. यावेळी मुंबई भाजप अध्यक्ष आम. आशीष शेलार, आम. राम कदम, आम. योगेश सागर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, अतुल काळसेकर, प्रदेश चिटणीस राजन तेली, माजी आम. शिवराव दळवी उपस्थित होते. भाजपच्या येथील उपक्रमाचा शुभारंभ केला.
परिवहन मंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री दीपक केसरकर, आम. वैभव नाईक, मुंबई महापौर स्नेहल आंबेकर, कल्याण महापौर राजेंद्र देवळेकर व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. या ठिकाणी शिवसेनेच्या उपक्रमाचा शुभारंभदेखील करण्यात आला.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह देवीचे दर्शन घेतले. पालकमंत्री दीपक केसरकर यांनी देवीचे दर्शन घेतल्यानंतर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. सिंधुदुर्ग जिल्हा भारतात सवरेत्कृष्ट सुखसंपन्न जिल्हा व्हावा अशी मागणी करताना राज्यातील दुष्काळी सावट दूर व्हावे म्हणून मागणी केली. आंगणेवाडीत विद्युतीकरण, पाण्याची सुविधा, भक्त निवास निर्माण करण्यासाठी पुढील काळात प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
आंगणेवाडी देवीच्या दर्शनासाठी भल्या पहाटे लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. राजकीय पक्षांनी भक्तांना सेवा-सुविधा देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले होते. दोन दिवस चालणाऱ्या या उत्सवात लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होते. त्यामुळे अनेक विक्रेत्यांनी भक्तांच्या सेवेला साथ दिली. भराडी मातेचा उत्सव उद्यापर्यंत चालणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 2:12 am

Web Title: anganewadi jatra 2016 bharadi devi temple anganewadi festival
Next Stories
1 कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे न घेतल्यास एसटी रोखणार -राणे
2 कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग बंदरविकासाला पूरक
3 नक्षलग्रस्त जिल्ह्य़ांतील पोलिस खबऱ्यांना १.३८ कोटींची मदत
Just Now!
X