News Flash

श्री देवी भराडी मातेच्या यात्रौत्सवासाठी आंगणेवाडी सज्ज

आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेच्या यात्रौत्सव उद्या गुरुवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी थाटात संपन्न होणार आहे. लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्ग

| February 14, 2013 05:09 am

आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी मातेच्या यात्रौत्सव उद्या गुरुवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी थाटात संपन्न होणार आहे. लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातच नव्हे तर महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातही आंगणेवाडीचा उत्सव प्रसिद्ध आहे. मालवण तालुक्यातील मसुरे या गावातील बारा वाडय़ांपैकी आंगणेवाडी ही एक वाडी. या वाडीवर श्री देवी भराडी मातेचे मंदिर आहे. भराडीवर देवीचा दृष्टांत झाला म्हणून श्री देवी भराडी माता म्हणून संबोधली गेली. या वाडीत आंगणे आडनावाचे लोक जास्त प्रमाणात राहत असल्याने आंगणेवाडी असे नाव पडले आहे. आंगणेवाडीची श्री देवी भराडी माता नवसाला पावते म्हणून दरवर्षी लाखो भक्त उत्सवास येतात, दोन दिवसांचा उत्सव चालतो. देवीच्या दर्शनासाठी भल्यामोठय़ा रांगा लावल्या जातात. झुलता पूल व अन्य अशा रांगातून भाविक देवीचे दर्शन घेतात.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे या जत्रौत्सवास येत आहेत. तसेच राज्याचे मंत्री, आमदार, खासदार, मुंबई व ठाणे महापालिकेचे नगरसेवक, महापौर असे विविध क्षेत्रांतील मान्यवर या जत्रौत्सवास उपस्थित राहतात. पूर्वी गँगस्टरही देवीच्या दर्शनासाठी यायचे. या उत्सवास सर्व प्रकारच्या भक्तांची मांदियाळी असते. श्री देवी भराडी मातेच्या उत्सवासाठी दर वर्षी गर्दीचा उच्चांक लोक पाहत आहेत. सुमारे १५ ते २० लाख भाविक दोन दिवसांच्या उत्सवात उपस्थिती दर्शवितात. या वेळी राजकीय पक्ष सेवा देण्याचे कामही करतात. पोलिसांच्या संरक्षणाशिवाय विविध मंडळेही या ठिकाणी सेवा कार्यासाठी वेळ देत असल्याचे सांगण्यात येते.
या देवीच्या उगमाविषयी कथा सांगण्यात येते. शिवाय देवीच्या नवसाला पावणाऱ्या अनेक चमत्कारांविषयी बोलले जाते. त्यापैकी एक कथा पेशवाईशी जोडली गेली आहे. आंगणेवाडीतील पराक्रमी वीर पुरुष चिमाजी आप्पांच्या सेवेत गुप्तहेर होता. अटकेपार भगवा झेंडा फडकविण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता असा इतिहास सांगितला जातो. या स्वराज्य सेवेवर प्रसन्न होऊन कुलस्वामिनी देवी तुळजाभवानी प्रसन्न होऊन मसुरे गावातील आंगणेवाडी या छोटय़ाशा भराडावर प्रकट झाली. या वीर पुरुषाला दृष्टांत झाला. त्याची दुभती गाय पान्हा सोडत असलेल्या जागी त्याने पाळत ठेवली. तेथे जवळच राईत जाऊन पाषाणावर आपल्या पान्ह्य़ाचा अभिषेक करताना गाय दिसली. या साक्षात्काराने प्रेरित होऊन राई मोकळी केली. गाय ज्या पाषाणावर पान्हा सोडायची, त्या जागी सजीव पाषाण सापडले. त्यानंतर पाषाणाची शुद्धता व प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
या देवीचा चरितार्थ चिमाजी आप्पांनी इनाम दिलेले दोन हजार एकर भरड आणि शेतजमीन आंगणे लोकांच्या वहिवाटीखाली आहे. देवीची जत्रा शेतीची कामे आटोपल्यावर ठरते. सर्वजण एकत्र येतात व डाळप करतात. त्यानंतर शिकार करून देवीचा कृपाप्रसाद घेतल्यानंतर एक महिना पूर्वीच देवीच्या उत्सवाची तिथी निश्चित होते. या जत्रेत देवीच्या दर्शनासोबतच विविध खरेदीची दुकाने थाटली जातात. त्यात शेतीअवजारापासून सुक्या म्हावऱ्यापर्यंत या जत्रौत्सवात विक्रीचा थाट चालतो. त्यासाठी मोठ-मोठे मंडप थाटले जातात. वाहनांची पार्किंग व्यवस्था केली जाते, तसेच सामान्य व व्हीआयपी भक्तांसाठी खास रांगा असतात. जत्रेच्या दिवशी देवीची पहिली ओटी भरल्यावर उत्सवास सुरुवात होते. देवीचा नैवद्य दाखविताना दर्शन थांबविले जाते. महाप्रसाद सर्वाना दिला जातो. मोड जत्राही थाटात भरवली जाते. या उत्सवासाठी खास रेल्वे, एस.टी. बस सोडल्या जातात. शिवाय मुंबईहून खास वाहने करूनही भक्त येतात. आंगणेवाडी जत्रौत्सवास पूर्वसंधीलाच थाटात प्रारंभ झाला. कडेकोट पोलीस बंदोबस्त हे या उत्सवाचे वैशिष्टय़ मानले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 5:09 am

Web Title: anganewadi ready for shri devi bharadi mata pilgrime festival
Next Stories
1 पर्यावरणविषयक अटी शिथिल करण्याची गरज – नारायण राणे
2 निराधारांना निवृत्ती वेतन देण्यात महाराष्ट्राची कंजुषी
3 आधार कार्ड अधिकृत सरकारी दस्तावेज नाही!
Just Now!
X