उस्मानाबादमध्ये दुष्काळ पाहणी दौरा सुरू असताना शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना शुक्रवारी शेतकरी संघटनाच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी तावडे यांना काळे फलक दाखविण्यात आले तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या एका कार्यकर्त्यांने त्यांच्या दिशेने दुधाची बाटलीही फेकली. या प्रकारामुळे दौऱ्यामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले.
राज्यातील सर्व मंत्री शुक्रवारी आणि शनिवारी लातूर, उस्मानाबाद आणि बीड या तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. या जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांना मंत्री भेट देणार असून, त्याचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देणार आहेत. मंत्रिमंडळाची बैठकत दुष्काळाची दाहकता आणि सरकारी उपाययोजना यावर चर्चा करण्यात येणार आहे. या दौऱ्यामध्ये विनोद तावडे उस्मानाबादमधील परिस्थितीची पाहणी करीत आहेत. शुक्रवारी सकाळपासूनच त्यांना शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी विनोद तावडे यांना काळे फलक दाखवत सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पाहणी नको पाणी द्या, अशी मागणी करत तावडे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुमारे १५ मिनिटे तावडे यांना थांबवून ठेवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी जमावाला बाजूला काढत तावडे यांच्या गाडीला जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला. या ठिकाणी काँग्रेसच्याविरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांच्या समर्थनात घोषणाबाजी केली.
त्यानंतर तावडे येडशी येथे एका शाळेची पाहणी करून येत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनाच्या कार्यकर्ते व जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांनी दुधाची बाटली तावडे यांच्या दिशेने फेकली. अचानक झालेल्या या प्रकारानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी इंगळे यांना बेदम मारहाण केली. पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
शेतकऱ्यांच्या मुलांसाठी काम करणाऱ्या मंत्र्यावर हल्ला का, तावडेंचा सवाल
शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक शुल्क माफ करणे, शेतकऱ्यांच्या मुलांचे परीक्षा शुल्क माफ करणे, दुष्काळग्रस्त भागातील मुलांच्या परीक्षा लवकर घेऊन त्यांना घरी लवकर पाठविणे हे सर्व मी करत असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माझ्यावर हल्ला का केला? हे अनाकलनीय आहे असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्प्ष्ट केले आहे.
उस्मानाबादमधील दुष्काळी भागांच्या भेटीवर आलेले तावडे येडशी येथील शाळेत गेले असताना हा प्रसंग घडला. त्यासंदर्भात तावडे यांनी सांगितले की, हल्ला करणारा इंगळे हा तुळजापूरला राहणारा होता. पण त्याने तेथे गेलेल्या मंत्र्यांसमोर निदर्शने न करता मी शाळेच्या आवारात लहान मुलांसोबत असताना काचेची बाटली माझ्यावर फेकण्याचा काय उद्देश हेाता? तीच बाटली कोणा विद्यार्थ्याला लागली असती तर काय घडले असते असा सवाल त्यांनी उपस्थित केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने माझ्यावर हा हल्ला करण्याचा उद्देश काय होता. माझ्यावर हल्ला होण्याआधीच स्वाभिमानी संघटनेचे प्रदेश नेते विचारणा करीत होते. बातमी मिळाली का? याचा अर्थ हा हल्ला पूर्वनियेाजित होता. स्वाभिमानी संघटनेला शेतकरी हिताचं काम करणारा, मराठा आरक्षणासाठी लढणारा मंत्री म्हणून माझ्यावर राग आहे का? याचं उत्तर स्वाभिमानी संघटनेने द्यायला हवं असेही तावडे यांनी म्हटले आहे.
माझ्या स्वीय सहायकांनी केलेल्या कथित मारहाणीची पोलीस चौकशी करतील व दोषीला शिक्षा होईल पण पोलिसांनी माझ्यावर हल्ला करताना स्वाभिमानी संघटनेचा उद्देश काय होता हे पण तपासायला हवे असेही श्री.विनोद तावडे यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.