शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण वेळ शेतकऱ्यांसाठी वेळ देत नसल्यामुळे त्यांचा निषेध करीत ठिय्या आंदोलनातील हजारो शेतकऱ्यांनी पोलिसांचे कवच तोडून रामगिरीकडे कूच केल्याने पोलीस प्रशासनाची ताराबंळ उडाली. आक्रमकपणे घोषणा देत निघालेला मोर्चा लेडीज क्लब चौकात अडविल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला.
अधिवेशनाच्या काळात शेतकरी संघटनेतर्फे दरवर्षी मोर्चा काढला जात असताना वेळी मात्र अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकरी संघिटनेचे अध्यक्ष रवी देवांग, माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वात रिझर्व बँक क्वार्टर चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. विदर्भातील विविध जिल्ह्य़ातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. दुपारी १२ वाजता प्रारंभ झाल्यानंतर शेतकरी संघटनेच्या विविध नेत्यांची भाषणे झाली. मुख्यमंत्री दुपारी नागपुरात आले असताना त्यांनी शेतक ऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला भेट द्यावी, अशी मागणी करीत शेतकरी आक्रमक झाले होते. सायंकाळी पाच वाजले तरी पोलिसांकडून मुख्यमंत्री येतात की नाही याबाबत काहीच सांगितले जात नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा देणे सुरू केले. माजी आमदार अनिल बोंडे यांचे भाषण आटोपताच आंदोलनात सहभागी झालेले शेकडो शेतकरी घोषणा देत पोलिसांचे सुरक्षा कवच भेदून समोर निघाले.
आमदार वामनराव चटप, राम नेवले, अनिल बोंडे मोर्चाचे नेतृत्व करीत असताना पोलिसांनी मोर्चाला आमदार निवाससमोर अडविण्याचा प्रयत्न केला मात्र, मोर्चा अधिक हिंसक झाल्यामुळे शेतकरी काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेतक ऱ्यांचा मोर्चा समोर निघत असताना वायरलेसवरून माहिती देण्यात आली. तहसील कार्यालया समोर वामनराव चटप आणि राम नेवले यांना अडविण्यात आले असताना पोलिसांशी वादावादी  झाली त्यामुळे शेतकरी अधिक आक्रमक झाले होते. पोलिसांच्या सुरक्षा कवचाला मोर्चा मानत नाही नसल्याचे दिसताच पोलिस अधिकाऱ्यांची भांबेरी उडाली. वायरलेसवरून लेडीज क्लब चौकात सुरक्षा कठडे उभारण्यासोबतच अतिरिक्त ताफा बोलविण्याच्या सूचना देण्यात आल्या. अखेर लेडीज क्लब चौकात मोर्चा अडविण्यात पोलिसांना यश आले. एकीकडे रामगिरीवर चहापानाचा कार्यक्रम सुरू असताना घटनास्थळी मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा निषेध करीत घोषणा दिल्या जात होत्या.
मुख्यमंत्री येत नाहीत तोपर्यत हटायचे नाही, असा पवित्रा शेतक ऱ्यांनी घेतला होता.      
१२ विधेयके मांडणार
या अधिवेशनात खाजगी विद्यापीठ, जादूटोणा प्रतिबंध, मोडकळीस आलेल्या इमारतींची पुनर्बाधणी कराताना त्यातील रहिवाशांना काढण्याचा अधिकार, नगरविकास मंत्र्यांचे न्यायीक अधिकार सचिवांना प्रदान करणे आदी १२ विधेयके मांडण्यात येणार असून ती मंजूर करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ‘खाजगी विद्यापीठ कायदा’ सभागृहात मंजूर झाला मात्र राज्यपालांशी झालेल्या चर्चेनुसार हे विधेयक पुन्हा मागे घेण्यात आले असून नव्या सुधारणांसह मांडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.