अनिकेतच्या आकांताकडे पोलिसांचा कानाडोळा

‘मला सोडा, श्वास गुदमरतोय’ असे अनिकेत जीवाच्या आकांताने ओरडून सांगत होता. मात्र, चौकशी करणाऱ्यांच्या हातातील काठी काही थांबत नव्हती. अनिकेतचा श्वास थांबला, तेव्हा त्यांच्या हातातील काठी थांबली. त्या रात्री सांगली शहर पोलीस ठाण्यात कायद्याच्या रक्षकांकडून घडलेल्या अत्याचाराची कहाणी सरकारी पक्षाच्या तक्रारीतून स्पष्ट झाली आहे.

अनिकेत कोथळे याचा पोलीस कोठडीत पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला. याप्रकरणी फौजदार युवराज कामटे आणि त्याच्या पाच साथीदारांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक राजन माने यांनी फिर्याद दाखल केली. या तक्रारीतील शब्द वाचले तरी सामान्यांच्या काळजाचा ठोका चुकेल.

अनिकेत आणि त्याचा मित्र अमोल भंडारी यांना कथित लूटमारप्रकरणी अटक केल्यानंतर त्याच रात्री चौकशीच्या नावाखाली कामटे याने दोघांना डीबी रूममध्ये घेतले. यावेळी कामटे आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या अमानुष मारहाणीबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

सर्वप्रथम दोघांनाही निर्वस्त्र करण्यात आले. दोरीने दोन्ही हात बांधून लाठीने पायाच्या पिढऱ्यावर बडविण्यात आले. ‘सांग यापूर्वी किती चोऱ्या, किती ठिकाणी लूटमार केली आहेस?’ असे प्रश्न विचारण्यात येत होते. मात्र, कबुली मिळत नाही, असे दिसताच निर्वस्त्र अनिकेतच्या हाताला दोरी बांधून छताला टांगण्यात आले. या वेळी तोंडावर काळे कापड बांधण्यात आले होते. काठीचे तडाखे तर सुरूच होते.

यातच खाली ठेवलेल्या पाण्याच्या बादलीत त्याचे डोके बुडविण्यात येत होते. श्वास कोंडल्यानंतर तरी कबुली द्यावी यासाठी हा प्रकार सुरू होता. अनिकेत ओरडत होता, ‘माझा श्वास कोंडतो आहे, मला किमान श्वास तरी घेऊ दे,’ मात्र कामटे ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. अखेर दोरी तुटली अन् अनिकेत खाली बादलीसह फरशीवर कोसळला. बेशुद्ध पडला. यावर चौकशी करणारे पोलीस शुद्धीवर आले, मात्र तोपर्यंत अनिकेतचा श्वास बंद झाला होता. त्यानंतर त्याचा मित्र अमोल याला तोंडाने हवा द्यायला भाग पाडण्यात आले. मात्र, अनिकेतच्या आयुष्याचीही दोरीच तुटली होती अन् एका श्वासाचे अंतर संपले होते.

आंबोली घाटात मृतदेह जाळला

अनिकेतच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कृष्णाकाठ पालथा घालण्यात आला. मात्र, ते अशक्य असल्याचे लक्षात येताच यातील सहभागी पोलीस हवालदार लाड याच्या मोटारीतून मृतदेह आंबोली घाटात महादेवगड पाँइंटवर जाळण्यात आला. ही कथा आहे ती पोलिसांच्या क्रूरकर्माची आणि पोलीस अधिकाऱ्यांनीच दिलेल्या फिर्यादीतील. या खूनप्रकरणी फौजदार कामटेसह सहा आरोपी कोठडीत आपल्या प्रतापाची माहिती देत आहेत.

आणखी सात पोलीस निलंबित

अनिकेतच्या मृत्यूप्रकरणी आणखी सात पोलीस कर्मचाऱ्यांना शनिवारी निलंबित करण्यात आले. कोठडीतील मृत्यूनंतर प्रकरण दडपण्याचा झालेला प्रकार धक्कादायक असल्याचे सांगत तक्रारी असूनही फौजदार युवराज कामटेवर कारवाई का टाळण्यात आली, याची चौकशी करण्यात येत असल्याचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे अपर महासंचालक बिपीन बिहारी यांनी सांगितले. प्रकरणात संशयास्पद भूमिका घेणाऱ्या उपअधीक्षक दीपाली काळे यांना सहआरोपी करावे आणि पोलीस अधीक्षक दत्तात्रय िशदे यांची बदली करावी, या मागणीसाठी सोमवारी ‘सांगली बंद’चे आवाहन सर्वपक्षीय कृती समितीने केले आहे.