‘दि गोल्फ क्लब’लाच टाळे

वाई :  महाबळेश्वरच्या गोल्फ मैदानावर ऐन संचारबंदीमध्ये उद्योगपती अनिल अंबानी चालण्यास येत असत. त्यामुळे गोल्फ मैदानावर होत असलेली गर्दी लक्षात घेता गोल्फ क्लबला टाळे ठोकण्यात आले आहे.

उद्योगपती अनिल अंबानी हे आपल्या परिवारासह सध्या महाबळेश्वर येथे उद्योगपती अनुप मेहतांच्या बंगल्यावर मागील पंधरा दिवसांपासून वास्तव्यास आहेत. या काळात त्यांनी आपली चालण्याची सवय कायम ठेवली असून येथील गोल्फ क्लबच्या मैदानावर ते सकाळ- संध्याकाळ चालण्यासाठी येतात. त्या मुळे या मैदानाची मालकी असलेल्या संस्थेला पालिकेने नोटीस बजावून दंडात्मक कारवाईचा इशारा दिला असून  गोल्फ क्लबच्या मैदानाला टाळे ठोकले आहे.

रविवारी सायंकाळी अंबानी कुटुंबासमवेत गोल्फ मैदानावर चालण्यासाठी आले होते. ते गोल्फ मैदानावर येत असल्याचे शहरात समजल्याने दैनंदिन चालण्यासाठी जी काही मंडळी इतर ठिकाणी जात होती त्यांनी आपली रोजचा मार्ग  बदलून गोल्फ मैदानावर चालायला येण्यास सुरुवात केली. त्या मुळे हळूहळू या मैदानावर सकाळी, संध्याकाळी नागरिकांची गर्दी होऊ लागली.

टाळेबंदी तसेच संचारबंदी असल्यामुळे घराबाहेर पडण्यासाठी नियमावली असताना उद्योगपती अंबानी हे सकाळ-संध्याकाळी नियमित चालण्यासाठी गोल्फ मैदानावर येत असल्याची माहिती पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी भोरे पाटील यांना मिळाली. त्यांनी तातडीने या बाबत खात्री करून घेऊन गोल्फ मैदानाची मालकी असलेल्या ‘दि गोल्फ क्लब’ या संस्थेच्या सचिवांना नोटीस बजावली असून दंडात्मक कारवाईचा इशारा दिला आहे. या नोटीसमुळे क्लबने गोल्फ मैदानाला टाळे ठोकले असून नागरिकांना फिरणे, चालण्यासाठी आजपासून हे मैदान बंद करण्यात आले आहे.