ख्यातनाम साहित्यिक कै. पु. ल. देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा पुलोत्सव सन्मान पुरस्कार प्रसिद्ध साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांना जाहीर झाला असून, येत्या २ नोव्हेंबर रोजी समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.
आर्ट सर्कल, रत्नागिरी आणि आशय सांस्कृतिक, पुणे या संस्थांतर्फे दरवर्षी संयुक्तपणे पुलोत्सव आयोजित करण्यात येतो. यंदा येत्या २ ते ४ नोव्हेंबर या काळात येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृहात हा महोत्सव साजरा होणार आहे. डॉ. अवचट यांच्या हस्ते येत्या २ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, याप्रसंगी अवचट यांचा पुलोत्सव सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. त्यानंतर डॉ. अवचट यांच्याशी साहित्यिक गप्पा रंगणार आहेत. तसेच मराठी संगीत रंगभूमीवरील महान गायक-अभिनेते कै. दीनानाथ मंगेशकर यांची गायकी समर्थपणे पेश करणारे स्वराधीश भरत बळवल्ली दीनानाथांची नाटय़गीते सादर करणार आहेत.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, ३ नोव्हेंबर रोजी मुंबईच्या आविष्कार या नाटय़संस्थेतर्फे ‘आयदान’ हे नाटक सादर करण्यात येणार आहे. प्रसिद्ध लेखिका ऊर्मिला पवार यांच्या आत्मचरित्रावर आधारित या नाटकाचे लेखन-दिग्दर्शन सुषमा देशपांडे यांनी केले आहे.
संगीत-कला क्षेत्रातील नव्या पिढीच्या कलाकारांचा गौरव या महोत्सवात ‘पुलोत्सव तरुणाई सन्मान’ पुरस्कार देऊन दरवर्षी केला जातो. महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी, ४ नोव्हेंबर रोजी प्रयोगशील गायक-संगीतकार कौशल इनामदार यांना या सन्मानाने गौरवण्यात येणार आहे. त्यानंतर हार्मोनियम आणि सिंथेसायझर या वाद्यांच्या जुगलबंदीचा ‘जादूई पेटी’ हा कार्यक्रम सादर होणार आहे. ‘सारेगम’फेम सिंथेसायझरवादक सत्यजित प्रभू आणि सुप्रसिद्ध युवा हार्मोनियम वादक आदित्य ओक या कार्यक्रमाद्वारे आपल्या बोटांची जादू सादर करणार आहेत.
पुण्याबरोबरच पुलंची सासुरवाडी असलेल्या रत्नागिरीत गेली सलग सात वष्रे हा महोत्सव आयोजित केला जात आहे. पुल-सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य अंग असलेल्या सामाजिक जाणिवेचे स्मरण ठेवून या महोत्सवात ‘सामाजिक कृतज्ञता पुरस्कार’ रत्नागिरीत प्रथम देण्यात आला. त्यानंतर अन्यत्र त्याचे अनुकरण झाले. उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेची या पुरस्कारासाठी निवड केली जाते.
या संस्थेचे नाव लवकरच जाहीर करण्यात येईल, असे आर्ट सर्कलचे अध्यक्ष जयंत प्रभुदेसाई यांनी स्पष्ट केले. संपूर्ण महोत्सव सावरकर नाटय़गृहात होणार असून आर्ट सर्कलच्या सभासदांसाठी असलेली बैठक व्यवस्था वगळता उपलब्ध आसनांसाठी दैनंदिन तिकीट विक्री सावरकर नाटय़गृहावर होणार आहे.