राज्यातील सत्ता स्थापनेला सहा महिन्यांचा काळ लोटला असला, तरी सत्ता स्थापनेच्या काळात झालेल्या चर्चांवरून नवनवे गौप्यस्फोट अधून होत आहेत. काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीनं विशेषतः शरद पवारांनी भाजपाला ऑफर दिली होती, असा दावा करत फडणवीस यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. फडणवीस यांनी केलेल्या या गौप्यस्फोटावर राज्याचे गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी खुलासा केला आहे. ‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी चर्चेच्या दाव्याला उत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला की, शरद पवारांनी भाजपाला ऑफर दिली होती. पण खरं काय? असा प्रश्न देशमुख यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले,”असं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब सध्या अस्वस्थ आहेत. बेचैन आहेत. त्यांना सुरूवातीला स्वप्न पडत होती सरकारमध्ये येण्याची, पण त्यांचा स्वप्नभंग झाला. त्यामुळे अशा प्रकारचं स्टेटमेंट करून जुन्या गोष्टी काढत राहतात. करोनाच्या काळात आमचं सरकार व्यवस्थित काम करत आहे. आमचं पोलीस खातं आहे, आमचे डॉक्टर्स आहेत. अशावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जुन्या गोष्टी काढून वातावरण खराब करण्यापेक्षा अशा करोनाच्या स्थितीमध्ये सरकारच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केल पाहिजे,” असं आवाहन देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांना केलं.

आणखी वाचा- चमत्काराची वाट पाहणाऱ्यांचा हा चमत्कारिक कारभार; शेलारांची सरकारवर टीका

चर्चा करण्याचा प्रश्नच नव्हता…

याच मुद्यावर पुढे बोलताना देशमुख म्हणाले,”नाही, चर्चा करण्याचा प्रश्नच नव्हता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमची सुरूवातीपासूनची युती होती आणि त्याच पद्धतीनं आम्ही निवडणुका लढल्या. त्यानंतर शिवसेना आमच्याबरोबर आली. या तिन्ही पक्षांचं चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रात सरकार सुरू आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस अस्वस्थ असल्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्ये ते करत असतात,” असा टोला देशमुख यांनी फडणवीसांना लगावला.