News Flash

देशमुखांचा राजीनामा म्हणजे आमच्या लढ्याला मिळालेलं यश; महाराष्ट्र भाजपाचा दावा

'जबाबदार विरोधी पक्षापुढे सरकार नमले'

(Photo credit: Twitter/MahaDGIPR and Twitter/BJP4Maharashtra)

राज्यामधील महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री पदावर असणाऱ्या अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर मागील अनेक दिवसांपासून देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच आज न्यायालयाच्या निकालानंतर देखमुख यांनी राजीनामा दिलाय. परमबीर सिंह यांनी देशमुखांवर १०० कोटींच्या वसुलीचे लक्ष्य देण्यात आल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात आज मुंबई उच्च न्यालायाने सीबीआयला चौकशीचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांनी राजीनामा दिल्याचं ट्विटरवरुन सांगितल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झालीय. त्यातच महाराष्ट्र भाजपाने देशमुख यांचा राजीनामा हा विरोधी पक्ष म्हणून आमचं यश आहे, असं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> “…म्हणून मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे”; अनिल देशमुखांचे राजीनामा पत्र जसच्या तसं

गृहमंत्री देशमुखांचा राजीनामा या मथळ्याखाली महाराष्ट्र भाजपाच्या ट्विटरवरुन एक फोटो शेअर करण्यात आलाय. या फोटोच्या खाली, ‘भाजपाच्या आणखी एका लढ्याला यश’ आणि ‘जबाबदार विरोधी पक्षापुढे सरकार नमले’ अशी वाक्य लिहिण्यात आली आहेत. तसेच हा फोटो शेअर करताना, “अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावाच लागला. गृहमंत्रीच वसुलीचं टार्गेट देतात, हे आरोप झाल्यावरही देशमुख खुर्चीला चिकटूनच होते. भाजपाने एक जबाबदार विरोधी पक्ष म्हणून या प्रकरणी दिलेल्या लढ्याला यश आलं,” असंही महाराष्ट्र भाजपाने म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटलांकडून पवारांना टोलाही आणि निर्णयाचा स्वागतही

देशमुख यांच्या राजीनाम्याची बातमी समोर आल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पाटील यांनी शरद पवारांनी राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. “जे जे चुकेल त्याला शासन आहे, तोपर्यंत लोकशाही सदृढ होणार नाही. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही मनात शंक होती. पवारांच्या घरी बैठक आहे, काय निर्णय घेतील? धनंजय मुंडेंच्या वेळीही सहा तास पवारांच्या घरी बैठक चालली. पण शेवटी धनंजय मुंडे राजीनामा देणार नाहीत असा निर्णय झाला. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतरदेखील शरद पवारांकडे बैठक झाली. त्यावेळी राजीनामा न घेण्याचा निर्णय झाला. शरद पवारांनी बऱ्याच गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. पण खोटं पडल्यानंतर त्यांनी बोलणंच बंद केलं. पण शरद पवार निर्णय घेत नाहीत तोवर राजीनामा झाला नसता. त्यामुळे मी समाधान करतो. शरद पवारांनी संवेदनशीलतेने सीबीआयचा तपास लागल्यावर मंत्रीपदावर राहता येत नाही याची जाणीव ठेवून निर्णय घेतला आहे,” असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2021 3:45 pm

Web Title: anil deshmukh resignation is our win as opposition party says bjp maharashtra scsg 91
Next Stories
1 गृहमंत्रीपद कोणाकडे सोपवणार?; नवाब मलिक यांनी केलं स्पष्ट
2 अनिल देशमुखांचे राजीनामा पत्र : “…म्हणून मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतोय”
3 अनिल देशमुखांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया
Just Now!
X