News Flash

“अनिल देशमुखांनी शरद पवारांना तर धमकी दिली नाही ना?”

पवार दुपारी एक आणि रात्री दुसरंच बोलले; सुधीर मुनगंटीवारांनी उपस्थित केली शंका

गृहमंत्री अनिल देशमुख व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. (संग्रहित छायाचित्र)

परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रावर भूमिका मांडतांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ, अशी भूमिका सुरूवातीला मांडली. नंतर देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचं रात्री सांगितलं. शरद पवारांच्या या दोन वेगळ्या विधानांवरून भाजपाने वेगळीच शंका उपस्थित केली आहे. अनिल देशमुख यांनी शरद पवारांना तर धमकी दिली नाही ना?,” असा सवाल भाजपाचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला आहे.

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुनगंटीवार यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. मुनगंटीवार म्हणाले, “पोलीस महासंचालक दर्जाच्या एका पोलीस अधिकाऱ्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. या सर्व आरोपांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशामार्फत, सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाखाली किंवा सीबीआयमार्फत चौकशी होणे अत्यावश्यक आहे. परमबीर सिंग यांनी यापूर्वीच वर्षा या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील प्रमुख मंडळींना या सर्व प्रकरणासंदर्भात माहिती दिल्याचे पत्रात नमूद केले आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतल्याचे दिसून आलेले नाही,” असं मुनगंटीवार म्हणाले.

“परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांबाबत शासनाकडून खुलासा प्रसिद्ध करण्याची तसदीही मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. सिंग यांनी तक्रार केलेल्या संबंधित मंत्र्यावर व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास मुख्यमंत्री असमर्थ ठरले आहेत, असं दिसतं. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून या घटनांबाबत अहवाल मागवावा व त्याची सत्यता तपासून तो राष्ट्रपतींना पाठवावा,” अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली आहे. या मागणीबाबत भाजपाचे शिष्टमंडळ बुधवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटणार असल्याचेही त्यांनी नमूद यावेळी सांगितलं.

“गृहमंत्री देशमुख हे १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारीपर्यंत क्वारंटाईन होते, असा खुलासा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवारांचा खुलासा धादांत असत्य आहे, हे दाखवून दिले आहे. आता तरी राष्ट्रवादीने गृहमंत्री देशमुख यांना निर्दोष ठरविण्याची घाई करू नये. रविवारी शरद पवार आधी म्हणाले की, अनिल देशमुखांचा राजीनामा घेणं हा मुख्यमंत्र्यांचा विषय आहे. रात्री म्हणाले राजीनाम्याची आवश्यकता नाही म्हणजे अनिल देशमुखांनी त्यांना धमकी तर दिली नाही ना?,” अशी शंका मुनगंटीवार यांनी उपस्थित केली.

“राज्याच्या गृहमंत्र्यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना बार व पब चालकांकडून वसुली करण्यास सांगितले होते. परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात केलेल्या आरोपांचे कोणत्याच पोलीस अधिकाऱ्याने अथवा बार चालकांनी खंडन केलेलं नाही. एकीकडे बार चालकांकडून, मद्य विक्रेत्यांकडून वसुली करण्यास सांगितले जाते. दुसरीकडे सरकारने डिसेंबर २०२० मध्ये विविध मद्य विक्री परवान्यांवर ५० टक्क्यांची सूट दिली आहे. शेतकरी व सामान्य ग्राहकांना वीज बिल माफी केली नाही तसेच कोरोनाच्या कठीण काळात बाराबलुतेदार असो वा छोटे व्यवसायिक अशा समाजातील कोणत्याच घटकांना आर्थिक सहाय्य दिले नाही. मात्र बार चालकांना सूट दिली गेली,” असंही त्यांनी नमूद केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 3:49 pm

Web Title: anil deshmukh sharad pawar threated sudhir mungatiwar appeal maharashtra governor bmh 90
Next Stories
1 परमबीर सिंह यांची सुप्रीम कोर्टात धाव; अनिल देशमुखांविरोधात सीबीआय चौकशीची मागणी
2 अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासंबंधी काँग्रेसचे राज्य प्रभारी एच के पाटील यांचं निवेदन; म्हणाले….
3 कितीही झाकलं तरी सत्य लपणार नाही! “ये पब्लिक है, ये सब जानती है!” – दरेकर
Just Now!
X