News Flash

भाजप मेळाव्यात अनिल गोटे यांना भाषणास मज्जाव

धुळे येथे प्रदेशाध्यक्षांसमोर गोटे समर्थकांचा गोंधळ

धुळे येथे भाजप मेळाव्यात व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि आ. अनिल गोटे यांच्यात वाद झाला. (छाया- विजय चौधरी)

धुळे येथे प्रदेशाध्यक्षांसमोर गोटे समर्थकांचा गोंधळ

महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर येथे शनिवारी रात्री प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आदींच्या उपस्थितीत झालेल्या भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात आमदार अनिल गोटे यांना भाषण करण्यास मज्जाव करण्यात आल्याने गोंधळ उडाला. या गोंधळामुळे गोटे यांना न बोलताच मेळाव्यातून बाहेर पडावे लागले.

मेळाव्याआधी येथील खासदार संपर्क कार्यालयात दानवे यांनी पत्रकार परिषदेत गिरीश महाजन यांच्याकडे प्रभारी म्हणून महापालिका निवडणुकीची सूत्रे सोपविण्यात आली असून संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

पक्षाचे राज्य संसदीय मंडळ उमेदवार निश्चितीचा निर्णय घेईल आणि उमेदवार कोण असतील हे जिल्ह्य़ाचे संसदीय मंडळ ठरवेल. आपण ठरवू तोच उमेदवार, असे म्हणणाऱ्यांना महत्त्व नसल्याचे नमूद करीत त्यांनी एकप्रकारे आमदार अनिल गोटे यांच्यावर महापालिका निवडणुकीची कोणतीही जबाबदारी राहणार नसल्याचे सूचित केले. स्वपक्षाच्या मंत्र्यांवर टीका करणाऱ्या आमदारास पक्ष ठरवेल त्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

पत्रकार परिषदेनंतर रात्री जमनालाल बजाज रस्त्यावर विजयी संकल्प मेळावा झाला. यावेळी आमदार गोटे यांनी व्यासपीठावर प्रवेश केला. पक्षाने कार्यक्रमांविषयी शहरात लावलेल्या फलकांवर गोटे यांना स्थान देण्यात आलेले नव्हते, तसेच त्यांना निमंत्रणही नव्हते. याची जाणीव गोटे यांनी मेळाव्यात करून देण्याचा प्रयत्न केला. महाजन यांच्या भाषणानंतर दानवे यांचे भाषण होणार होते. त्याआधीच गोटे यांनी ध्वनिक्षेपक हातात घेण्याचा प्रयत्न केला. त्यास काहींनी आक्षेप घेत केवळ निमंत्रितांनीच बोलावे, अशी भूमिका मांडली. यामुळे गोटे संतापले. व्यासपीठावर तीन मंत्री, पदाधिकारी असताना झालेल्या रेटारेटीत एकच गदारोळ उडाला.

सुरक्षिततेसाठी पोलिसांनी गोटे यांना कडे करून व्यासपीठावरून खाली आणले. यावेळी गोटे यांनी आपल्या समर्थकांना थोपविण्याचा प्रयत्न केला. काही समर्थकांनी खुच्र्या फेकून संताप व्यक्त केला. पोलिसांच्या मदतीने शांतता प्रस्थापित झाल्यावर सभेला पुन्हा सुरुवात झाली. यावेळी दानवे यांनी गोटे यांचे नाव न घेता, अशा घटना भाजपसाठी नव्या नसल्याचे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2018 12:52 am

Web Title: anil gote bjp
Next Stories
1 शिर्डीहून परतताना अपघातात पाच ठार
2 आधीच्या सरकारकडून लष्करी गरजा पूर्ण करण्यात हलगर्जी
3 दिवाळीतील दणदणाटात यंदा लक्षणीय घट
Just Now!
X