09 August 2020

News Flash

अनिल गोटेंमुळे धुळ्यात राष्ट्रवादीला नवे बळ

महानगरपालिका निवडणुकीपासून गोटे यांनी पक्षात राहून भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती

(संग्रहित छायाचित्र)

शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी गुरूवारी मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने शहरात भाजप विरोधात लढण्यासाठी राष्ट्रवादीला नवे बळ मिळणार आहे.

महानगरपालिका निवडणुकीपासून गोटे यांनी पक्षात राहून भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. नंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. त्याचवेळी ते भाजपमधून बाहेर पडतील, असे बोलले जात होते. महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी एप्रिलमध्ये त्यांनी भाजपचा राजीनामा दिला. भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांच्याविरुध्द लोकसभा निवडणूक लढवली. त्या निवडणुकीतही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर गोटे यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला. विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी पुरस्कृत उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली. परंतु, त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतरही त्यांनी भाजपवर दगाबाजीचा आरोप करीत खडे बोल सुनावले होते.

लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याशी वाढलेल्या जवळीकतेमुळे गोटे यांनी गुरूवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी त्यांच्या सोबत मुलगा तेजस गोटे, माजी उपनगराध्यक्ष दिलीप सांळुखे, विजय वाघ, संग्राम लिमये आदी होते.

भाजपमध्ये हलक्या कानाचे नेते- गोटे

भाजपमधील गटबाजीला कंटाळून बाहेर पडलो. भाजपमध्ये हलक्या कानाचे नेते असल्यामुळे माझ्यासमोर कुठलाही पर्याय उरला नव्हता, असे अनिल गोटे यांनी दूरध्वनीवरून सांगितले. कपटी मित्रापेक्षा, दिलदार शत्रु बरा, याचा प्रत्यय चार महिन्यात आला. सभागृहात अजित पवार, जयंतराव पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यावर मी टीका केली. परंतु, त्याबद्दल या नेत्यांनी चुकूनही मला वेगळे काही जाणवू दिले नाही. शरद पवार हे माझे जूने मित्र आहेत. त्यांनीच मला सोबत काम करण्याचा आग्रह केला होता. मी कधीही, कुठलेही पद मागत नाही. विधान परिषदेवर संधी देण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती स्विकारण्यात येईल, असे गोटे यांनी नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 13, 2019 1:00 am

Web Title: anil gote renews ncp in dhule abn 97
Next Stories
1 जाचाला कंटाळून तहसीलदाराच्या दालनात शेतकऱ्याने विषप्राशन केले
2 सोलापुरात कांद्याला साडेदहा हजारांचा उच्चांकी दर
3 ‘अनुकंपा’प्रकरणी लवकरच कारवाई
Just Now!
X