‘वेळेला केळी’ ही शहरातील उक्ती सध्या केळी उत्पादकांवर उलटल्याचे चित्र आहे. केळीचा टनाला अकरा हजार रुपये असलेला दर तीन हजार रुपयावर आल्याने केळी उत्पादक हैराण झाले आहेत. सध्या केळी काढणेही परवडत नसल्याने विक्री करण्यापेक्षा दावणीच्या जनावरांना खाद्य म्हणून देण्यास उत्पादकांनी प्रारंभ केला आहे. बाजारात सध्या डाळींपासून फळांपर्यंत सगळय़ा वस्तूंच्या महागाईची चर्चा होत असताना केळीला मात्र दरघसरणीचा फटका बसला आहे.
शासनाने फळ लागवडीला प्रोत्साहन दिल्यानंतर गेल्या काही वर्षांत सांगलीतील बागायती क्षेत्रात वाढ झाली आहे. या फळलागवडीमध्ये केळीचे प्रमाण वाढले. ‘जी-वन’ जातीची ‘टिश्यूकल्चर’ माध्यमातून विकसित केलेल्या केळींची लागवड मोठय़ा प्रमाणात केली जात आहे. प्रति रोप १४ रुपये दराने ‘जी-वन’ केळीच्या रोपांची खरेदी केली जाते. या रोपांच्या खरेदीनंतर शेणखत, रासायनिक खत, ठिबक सिंचन, औषधे यासाठी एकरी सुमारे ८० हजार रुपये खर्च येतो. याशिवाय आंतर मशागत, काढणी, बागेची निगराणी हा खर्च अतिरिक्त आहे. या भल्या मोठय़ा खर्चाच्या तुलनेत बाजार चांगला मिळाला तर ही केळी लागवड परवडते.
केळीच्या एका झाडापासून सर्वसाधारणपणे ४५ किलो केळी उत्पादन मिळते. एकरी ३० ते ४० टन उत्पादन गृहीत धरण्यात येते. यंदा केळीचा बाजारातील दर १५ ते २० रुपये डझन असला तरी शेतकऱ्यांकडून मात्र ३ हजार रुपये दराने खरेदी होत आहे. बागेतून बाहेर रस्त्यापर्यंत वाहतूक करण्याची जबाबदारी उत्पादकांवरच टाकण्यात येते. यासाठी लागणारी मजुरीही विक्रीतून मिळत नाही. यामुळे शेतकरी तयार केळी जनावरांना खायला देत आहेत.
दर आणि मागणी घसरण
गेल्या वर्षी शेतकऱ्यांना बाजाराने चांगलीच साथ दिली. टनाला ११ हजार रुपये दर मिळाला. मात्र यंदा बाजारात दिवाळीनंतर केळी खरेदीला ग्राहकांचा फारसा प्रतिसाद मिळेनासा झाला आहे. गेल्या १५ दिवसांपासून तर उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडल्याने केळीला ग्राहकच नाही. यातच यंदा मुंबई बाजारात जळगाव, सांगलीबरोबरच अन्य भागातूनही मोठय़ा प्रमाणात केळी आल्याने दर कोसळले.