News Flash

गुरांचे आठवडी बाजार बंद, मात्र उलाढाल सुरू !

ऑनलाइन पद्धतीने ८० टक्के पैसे जमा करून उर्वरित २० टक्के रक्कम ही म्हैस घरी आल्यानंतर द्यायची असा प्रकार या खरेदी व्यवहारात होतो.

(करोना साथीच्या उद्रेकापूर्वीचे गुरांच्या बाजारांचे दृश्य... आता निर्बंधांमुळे सर्व बाजार ओस पडले आहेत.

|| आसाराम लोमटे

करोनाकाळात खरेदी-विक्रीसाठी समाजमाध्यमांचा पर्याय

परभणी : करोना संकटामुळे सर्वच जीवन व्यवहारावर निर्बंध लागू झाल्याने राज्यात वेगवेगळ्या भागात भरणाऱ्या गुरांच्या आठवडी बाजारावरही बंदी आली. मात्र गेल्या वर्षभरात समाजमाध्यमांवर वेगवेगळ्या ग्रुपच्या माध्यमातून बैल, गाय, म्हैस, शेळ्या अशा जनावरांची खरेदी-विक्री करण्याचे प्रकार प्रचंड वाढले. त्यामुळे गुरांचे आठवडी बाजार बंद असले तरी या माध्यमातून ग्रामीण भागात प्रचंड प्रमाणात गुरांची खरेदी-विक्री झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रात असे असंख्य समूह समाजमाध्यमांवर तयार झाले आहेत.

दरवर्षी उन्हाळ्यात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आलेला असतो. सध्या शेतीत बऱ्याच प्रमाणात यांत्रिकीकरण आले असले तरी छोटे व मध्यम शेतकरी अजूनही बैलांच्या आधारे शेती करतात. पेरणीच्या आधी ग्रामीण भागात प्रचंड प्रमाणात गुरांची खरेदी-विक्री होत असते. मात्र गेल्या वर्षभरापासून गुरांचे आठवडी बाजार बंद आहेत. तरीही लोकांनी गुरांच्या खरेदी- विक्रीसाठी नवनवे पर्याय शोधले.

यासाठी फेसबुक, व्हॉटसअ‍ॅप यासारख्या माध्यमांचा उपयोग करण्यात आला. जिल्हानिहाय, तालुकानिहाय समूहसुद्धा फेसबुकवर तयार झाले आहेत. एवढेच नाही तर गाय, म्हैस, बैल, शेळ्या अशा प्राण्यांच्या वर्गवारीनुसार काही समूह तयार झाले आहेत. विशेष म्हणजे हे सर्व समूह टाळेबंदीच्या काळात निर्माण झाले आहेत. काही समूहांची सदस्य संख्या अक्षरश: हजारो आहे.

आपल्या बैलजोडीची छायाचित्रे समूहावर टाकायची. एवढेच नाही तर ती शेतीकामाला कशी चालतात हे ही चित्रफितीच्या माध्यमातून दाखवायचे व आपला संपर्क क्रमांक देऊन जे इच्छुक आहेत त्यांनी संपर्क करावा असे आवाहन यात केले जाते तर कधी आपल्याजवळ असलेल्या बैलाला जोडीदार हवा असेल तर आपल्याकडच्या बैलाची छायाचित्रे समूहावर टाकून त्याला जुळणारा जोडीदार हवा असल्याचे सांगितले जाते.

गेल्या काही वर्षांत हरियाणा, राजस्थान आदी ठिकाणाहून दुग्ध व्यवसायासाठी म्हैस आणण्याचे प्रमाण वाढले आहे. ऑनलाइन पद्धतीने ८० टक्के पैसे जमा करून उर्वरित २० टक्के रक्कम ही म्हैस घरी आल्यानंतर द्यायची असा प्रकार या खरेदी व्यवहारात होतो.

आठवडी बाजार बंद असल्याने समाजमाध्यमांवर आपल्या गुरांची माहिती देऊन खरेदी विक्रीचे प्रकार वाढले तरी गुरांच्या आठवडी बाजारावर अवलंबून असणाऱ्या अनेकांचा रोजगार मात्र हिरावला गेला आहे. आठवडी बाजारात गुरांचे चारा पुरवठादार, वाहतूक करणारे टेम्पो वाले, चहाटपऱ्या, खानावळी अशा अनेकांचा रोजगार यानिमित्ताने संपुष्टात आला आहे.

बाजाराचे अर्थकारण…

आठवडी बाजार हा अनेक गावे, निमशहरी, शहरी ठिकाणांसाठी मोठ्या आर्थिक उलाढालीचे केंद्र असतो. शहरांमधल्या चकचकीत मॉल्सपेक्षा या ठिकाणचा ग्राहक आणि विक्रेताही वेगळा असतो. शेकडो विक्रेते आपापल्या वस्तू आठवडी बाजारात विक्रीसाठी घेऊन येतात. भाजीपाला, सहजासहजी न मिळणाऱ्या रानभाज्यांपासून ते मसाल्याचे पदार्थ, शेतीसाठी उपयुक्त ठरणारी लहान-मोठी अवजारे, कपडा, मिठाया, मटन, मासे अशा असंख्य वस्तू या आठवडी बाजारामध्ये विक्रीसाठी असतात. त्या- त्या आठवडी बाजारातील काही प्रसिद्ध वस्तूही असतात आणि अशा वस्तूंसाठी हे बाजार ओळखले जातात. करोनाच्या दुसऱ्या लाटेत आठवडी बाजार बंद असल्याने ग्रामीण भागातील मोठी उलाढाल ठप्प होती. खरेदी-विक्रीसाठी आता ऑनलाइनचा पर्याय उपलब्ध असला आणि ग्रामीण भागातही या माध्यमातून विविध वस्तूंची खरेदी होत असली तरी आठवडी बाजाराचे महत्व अद्यापही टिकून आहे. ज्या ठिकाणचा आठवडी बाजार भरतो त्या बाजाराच्या दिवशी मजुरांना कामालाही सुट्टी असते. बहुसंख्य ठिकाणी बाजाराच्या दिवशी काम करणाऱ्यांना मोबदला दिला जातो. आठवड्यासाठी लागणारे अन्नधान्य, भाजीपाला व संसारोपयोगी वस्तू या ठिकाणाहूनच खरेदी केल्या जातात. स्थानिक वैशिष्ट्यांचा त्या त्या आठवडी बाजारावर प्रभाव असतो.

राज्यात अनेक बाजार प्रसिद्ध

महाराष्ट्रातील गुरांचे बाजार बंद असल्याने अक्षरश: लाखो रुपयांची उलाढाल थांबली होती. केवळ गाय, बैल, म्हैस या मोठ्या प्राण्यांची खरेदी विक्री अशा आठवडी बाजारात होते असे नाही तर भूमिहीन, कष्टकरी लोक शेळी, मेंढी, बोकड अशा प्राण्यांच्या संगोपनातून आपल्या संसाराचे आर्थिक गणित जमवतात. गुरांचे आठवडी बाजार बंद असल्याने या वर्गालाही मोठी झळ बसली. केवळ मराठवाड्यात नव्हे तर दोन-तीन राज्यांसाठी प्रसिद्ध असलेले काही गुरांचे बाजार आहेत. लातूर जिल्ह्यातील हळी हंडरगुळी येथील गुरांचा बाजार प्रसिद्ध असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुरांची खरेदी-विक्री होते. सुरुवातीला देवणी, लालकंधारी या जातीच्या पशूंची खरेदी-विक्री या बाजारात होत असे. आता महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, कर्नाटक आदी राज्यातूनही लोक या बाजारात येतात. तब्बल ६ ते ७ दशकांची परंपरा या गुरांच्या बाजाराला आहे. राज्यात अनेक ठिकाणी असे गुरांचे मोठे आठवडी बाजार भरतात. लाल कंधारी वळू ,उस्मानाबादी शेळी अशा स्थानिक गुणविशेष असलेल्या प्राण्यांची खरेदी-विक्री आठवडी बाजारातून होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 12:01 am

Web Title: animal week market closed corona virus infection facebook whatsapp akp 94
Next Stories
1 नाशिक येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘मॉडेल आयटीआय’; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता
2 राज्यात राबवणार ‘हेरिटेज ट्री’ संकल्पना; वृक्षांना मिळणार संरक्षण 
3 Corona Update : महाराष्ट्रात नव्या करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढली! मृतांचा आकडाही ३९३वर!
Just Now!
X