26 November 2020

News Flash

“एकनाथ खडसेंचं ऐकून तळपायाची आग मस्तकात गेली”

"वायफळ बडबड सतत ऐकत आहे"

(संग्रहित छायाचित्र)

एकनाथ खडसे यांनी भाजपामधून बाहेर पडताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश जाहीर झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ खडसे यांनी आपल्यावर दाखल झालेल्या विनयभंग गुन्ह्याचा उल्लेख केला. एकनाथ खडसेंनी यावेळी अंजली दमानिया यांचाही उल्लेख केला. अंजली दमानिया यांच्या तक्रारीनंतर माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असा आरोप खडसे यांनी केला आहे. खडसेंच्या आरोपांना आता अंजली दमानिया उत्तर देणार आहेत.

खडसेंचं ऐकून तळपायाची आग मस्तकात गेली असल्याचं सांगत संताप व्यक्त केला आहे. अंजली दमानिया यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “एकनाथ खडसेंच्या कालच्या पत्रकार परिषदेतल्या वक्तव्यावर मी न बोलण्याचा निर्णय घेतला होता. कारण ते काय म्हणाले हे मी प्रत्यक्षात ऐकले नव्हते. पण रात्री मी जेव्हा ऐकले तेव्हा तळपायाची आग मस्तकात गेली”.

दरम्यान अंजली दमानिया यांनी याच विषयावर आज मी मुंबई मराठी पत्रकार संघात संध्याकाळी ४.३० वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती दिली आहे. याआधी ट्विट करत त्यांनी आपण सतत एकनाथ खडसेंची वायफळ बडबड ऐकत असल्याचं म्हटलं होतं.

काय आहे हे प्रकरण?
७ सप्टेंबर २०१७ रोजी अंजली दमानियांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी खडसेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाकोला पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानातील (आयपीसी) कलम ५०९ (महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने हावभाव किंवा शब्दांचा वापर करणे) अंतर्गत खडसेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला. दमानिया यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून एकनाथ खडसे यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर केला होता. या भाषणात खडसे यांनी आपल्याबद्दल आक्षेपार्ह आणि असभ्य भाषा वापरली, असे दमानियांनी म्हटले होते. खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्ताईनगरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खडसेंनी आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी खडसेंविरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी दमानिया यांनी वाकोला पोलीस ठाण्यात गोंधळ घातला होता. पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असून, राज्यात महिला असुरक्षित आहेत, असा दावा दमानिया यांनी केला होता. त्यानंतर आयपीसीतील कलम ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा जळगावच्या हद्दीत घडल्याने हे प्रकरण जळगाव पोलिसांकडे वर्ग केले जाईल असंही सांगण्यात आलं होतं. दरम्यान त्यावेळी दमानिया यांचे आरोप खडसेंनी फेटाळून लावले होते. मी कोणत्याही महिलेचा अवमान करणारे वक्तव्य केलेले नाही, दमानिया यांना उद्देशून बोललेलो नाही असे खडसे यांनी म्हटले होते. दमानिया यांचा माझ्यावरच आरोप करण्यामागे काही हेतू आहे का, दरवेळी फक्त मलाच का टार्गेट केले जाते, असा सवाल त्यांनी विचारला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 12:21 pm

Web Title: anjali damania press conference on eknath khadse allegations sgy 87
Next Stories
1 यशोमती ठाकूर यांना दिलासा, शिक्षेला उच्च न्यायालयाची स्थगिती
2 “अजित पवारांसोबत पाच वाजता शपथ घेता आणि…,” एकनाथ खडसेंचा संताप
3 “अमित शाह तर आधुनिक भारताचे…”; अमृता फडणवीसांकडून वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा
Just Now!
X