विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडण्यास अजून वेळ असला, तरी सामाजिक संकेतस्थळांवर मात्र प्रचाराचा अतिरेक होऊ लागला आहे. उमेदवारी मिळण्यापूर्वीच अनेकांनी गुडघ्याला बािशग बांधून आपल्या नावाची बिरुदावली मिरवण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारच्या प्रचारात सध्या अण्णा, दादा, राजे, भय्या यांचा दबदबा असल्याचे दिसून येत आहे. इतर अनेकांसाठी हा प्रचार मात्र डोकेदुखी ठरूलागला आहे.
जिल्ह्य़ात प्रत्यक्ष प्रचार अजून सुरू झाला नसला, तरी सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून आतापासूनच प्रचाराला वेग आला आहे. ‘कामाचा माणूस’ ते ‘अबकी बार..’ अशी घोषणात्मक वाक्ये सध्या चच्रेच्या पटलावर आहेत. अनेक राजकीय पक्षांनी आपल्या अधिकृत संकेतस्थळाचेही उद्घाटन केले. या संकेतस्थळांच्या माध्यमातून आपली बाजू कशी भक्कम आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर या माध्यमातून टीकाही करूलागले आहेत. या टीकेतून वैयक्तिक पातळीही गाठली जाऊ लागली आहे.
सामाजिक संकेतस्थळापैकी सर्वात प्रभावी व्हॉट्सअॅपचा प्रचारासाठी मोठय़ा प्रमाणात वापर केला जाऊ लागला आहे. विविध प्रकारच्या घोषवाक्यांतून विरोधक-सत्ताधारी एकमेकांची उणीदुणी काढू लागली आहेत. लोकसभा निवडणुकीतील सामाजिक संकेतस्थळामधील मोदी क्रेझ आजही कायम आहे. प्रचारासाठी याच क्रेझचा वापर करून आपली छबी मतदारांसमोर व्यवस्थित झळकावण्याचा आटोकाट प्रयत्न नेतेमंडळी करीत आहेत.
जिल्ह्य़ातील विशेषत: ग्रामीण भागातील अनेक युवा कार्यकर्त्यांनाही विधानसभा निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत. सामाजिक संकेतस्थळावरून त्यांचाही जोरात प्रचार सुरूआहे. एखादी पोस्ट व्हॉटस्अॅप वर टाकत असताना त्याचा किती परिणाम होईल याचाही विचार केला जात आहे. या अनुषंगाने अधिकाधिक पोस्ट टाकून प्रचार जोरात सुरूअसल्याचे पाहायला मिळत आहे.