मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी विधानसभेत अभ्यासपूर्ण कामगिरी करण्याचा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नवनिर्वाचित आमदार नीलेश लंके यांना दिला. राज्यातील निवडणुकांचे निकाल पाहता मतदार जागृत झाले असल्याचे दिसून आले. हे निकोप व सदृढ लोकशाहीचे लक्षण असल्याची टिपण्णीही हजारे यांनी यावेळी बोलताना केली.

निवडणुकीत मोठय़ा मताधिक्कय़ाने विजय संपादन केल्यानंतर आ. लंके यांनी थेट राळेगणसिद्धीत जाऊन हजारे यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी हजारे यांनी लंके यांचे अभिनंदन करून पाण्याच्या प्रश्नावर काम करण्याचा निर्धार तडीस न्या असेही बजावले. येत्या दोन तीन दिवसांत हजारे व आ. लंके यांच्यात तालुक्याच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. अण्णा हे केवळ तालुक्याचे दैवत नसून साऱ्या देशाचे दैवत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील पाणीप्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न सोडविणार असल्याचे लंके यांनी सांगितले. मतदारसंघातील निवडणूक ही सर्वसामान्य जनतेने हाती घेतली होती. त्यामुळेच मोठय़ा मताधिक्कय़ाने माझा विजय झाला. यावेळी हजारे यांनी लंके यांना आमदार म्हणून संबोधताच मी आपला व जनतेचा सेवक आहे. आपण मला मार्गदर्शन करावे. आपले आशीर्वाद महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

हजारे म्हणाले, निवडणुकीतील निकाल पाहता मतदार जागृत झाल्याचे दिसून आहे. हे सुदृढ व निकोप लोकशाहीचे लक्ष आहे. प्रमुख चार पक्षांना मतदान करताना सत्ताधारी व विरोधी पक्ष असा समतोल मतदारांनी राखला. युती व आघाडीच्या उमेदवारांना मतदान करताना सत्ताधारी व विरोधी पक्ष जिवंत ठेवण्याचे काम मतदारांनी केले, असे मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.