ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या  दिल्लीत २३ मार्चपासून होणाऱ्या आंदोलनामुळे केंद्रातील मोदी सरकारला घाम फुटला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हजारे यांना आंदोलनापासून परावृत्त करण्याचा आटापिटा दोन दिवसांपासून  करीत आहेत.  मात्र, हजारे आपल्या भूमिकेवर ठाम असून, हुकूमशाहीकडे चाललेल्या या देशात चार वर्षांपासून पत्रव्यवहार करूनही प्रतिसाद मिळत नसताना आता पोकळ आश्वासनांचा काय उपयोग, असा सवाल करून दिल्लीतील आंदोलन होणारच असल्याचे त्यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मंत्री महाजन यांनी सोमवारी सायंकाळी अचानक राळेगणसिद्धीस भेट दिली. हजारे यांची भेट घेत येत्या २३ तारखेपासूनचे आंदोलन थांबविण्याची विनंती त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असाच निरोपही ते घेऊन आले होते. सरकार चर्चेस तयार आहे, असे त्यांनी सांगितले.

पुनश्च रामलीला!

हजारे यांच्या या आंदोलनासाठी त्यांच्या कार्यालयाकडून मोदी सरकारकडे गेल्या चार महिन्यांपासून पत्रव्यवहार करण्यात येत होता. आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील संबंधित कार्यालयांचे वारंवार उंबरे झिजविले होते, मात्र मोदी सरकारकडून काहीही प्रतिसाद देण्यात येत नव्हता. अखेर परवानगी नाकारल्यास तुरूंगात आंदोलन करण्याचा इशारा हजारे यांनी दिल्यानंतर सोमवारी सायंकाळी रामलीला मैदानावर आंदोलनासाठी जागा देण्यास सरकार राजी झाले.