नव्या कृषी कायद्यांना सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. मात्र, शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच असून, दिवसेंदिवस परिस्थिती चिघळत असल्याचं भीतीदायक चित्र दिसू लागलं आहे. दुसरीकडे नव्या कृषी कायद्यांविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामुळे अण्णा हजारे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न भाजपाकडून सुरू आहे. अण्णा हजारेंनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी त्यांना थेट सवाल केला आहे.

संजय राऊत यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शेतकरी आंदोलनाबद्दल भूमिका मांडली आहे.”देश योग्य दिशेनं जायला हवा. आज जे सिंघू बॉर्डरवर घडलं. पोलीस शेतकऱ्यांच्या तंबूत घुसले आहेत. सरकारला शेतकऱ्यांना उखडून फेकायचं आहे. प्रजासत्ताक दिनी जे घडलं, तो सरकारचा कट होता, हे जगजाहीर झालं आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांचं आंदोलन शिस्तबधपणे सुरू होतं. शेतकऱ्यांना मिळणारी सहानुभूती कमी करायची म्हणून बदनाम केलं गेलं. म्हणून तिरंग्याचा अपमान केल्याचा हातखंडा वापरला गेला. राजकीय राष्ट्रवाद. हे करणारे कोण होते भाजपाचे लोक होते. संसदेचं अधिवेशन सुरू होत असल्याच्या शुभमुहूर्तावर लोकशाहीचा गळा घोटायचा आहे. पंतप्रधान सगळ्या विषयांवर मत व्यक्त करतात. पण शेतकऱ्यांच्या आंदोलनावर बोलायला तयार नाहीत. तुमचा कायदा सोन्यानं मढवलेला असेल. पण, लोकमत बिथरलेलं आहे. कायदा लोकांसाठी असतो, त्यांनीच तो स्वीकारलेला नाही,”

“आता अण्णा हजारे उपोषणाला बसणार आहेत. आमचा त्यांना प्रश्न आहे, तुम्ही आधी शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा आहे हे जाहीर करा आणि मग तुमचं आंदोलन सुरू करा. अण्णा हजारे राळेगणसिद्धीत बसले आहेत. तिथे भाजपाचे नेते प्रस्ताव घेऊ येतायेत. मग तिथे बसून अण्णा तिथे चर्चा करत आहेत. हा प्रस्ताव आला. तो प्रस्ताव आला. कसला प्रस्ताव? एक स्पष्ट भूमिका घ्या. तुम्ही ठरवा, या बाजूला की त्या बाजूला? राहुल गांधींची भूमिका अगदी योग्य आहे. आमची ठरली आहे. शेतकरी दिल्लीत बसून लढतोय, इथे बसून कशाला प्रस्तावांवर चर्चा करायच्या? अण्णा हजारे यांनी भूमिका घ्यावी. त्यांना अशा प्रकारच्या आंदोलनाचा जास्त अनुभव आहे. मनमोहनसिंग यांचं राज्य असताना दोन आंदोलनं झाली. मग मधल्या सात वर्षात देशात सगळं आलबेल आहे का? माझं लक्ष आहे अण्णांच्या भूमिकेकडे,” असा सवाल संजय राऊत यांनी केला.