पारनेर : जोपर्यंत अंगात प्राण आहे तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार करीत सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी सरकारवर  सडकू न टीका केली.

हजारे म्हणाले,की कृषिप्रधान देशात शेतकरी आत्महत्या करतोय,एवढया आत्महत्या होऊनही सरकारला  सल नाही की वेदना होत नाहीत. सरकार हे सगळे डोळयांनी पाहतंय. ते आंधळं झालंय, त्याला दिसत नाही. आत्महत्येनंतर शेतकऱ्यांच्या घरात होत असलेला कल्लोळ सरकारला  ऐकू येत नाही. हे सरकार बहिरेही झालेले आहे. शेतकरी गाळात रूतला आहे, त्याला एकदा कर्जमाफी द्या व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, तो तुमच्या दारात पुन्हा कधीही येणार नाही. एकीकडे सरकार उद्योगपतींचे २५ लाख कोटींचे कर्ज माफ करीत आहे.

कर्ज बुडवून उद्योगपती परदेशात पळून जात आहेत. सरकार जेवढी चिंता उद्योगपतींची करते तेवढी शेतकरी वर्गाची केली जात नसल्याबद्दल हजारे यांनी खंत व्यक्त केली. देशात लोकतंत्र आहे की  नाही, असा सवाल करीत, केवळ गोरे गेले व काळे आले एवढाच फरक झाला आहे. शेतमालास खर्चावर आधारित  भाव देण्याचे मोदी सरकारने निवडणुकी दरम्यान आश्?वासन दिले होते. भ्रष्टाचार रोखण्यासाठी पाउले उचलणार असल्याचे सांगितले जात होते.

भ्रष्टाचार रोखण्यासाठी आम्ही अनेक वर्षे आंदोलने करीत आहोत. कायदा झाला परंतु अंमलबजावणी नाही. मोदी सरकार बहाणेबाजी  करीत असून देशाला भ्रष्टाचार मुक्त करण्याची या सरकारची इच्छा नाही. जोपर्यंत शरीरात प्राण आहेत तोपर्यंत आपले आंदोलन सुरूच राहणार असल्याचे हजारे यांनी या वेळी ठामपणे सांगितले.