माझ्या जीवाला बरं वाईट झाल्यास जनाता पंतप्रधान मोदींना जबाबदार धरेल, असा इशारा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मोदी सरकारला लगावला आहे. अण्णा हजारे यांच्या उपोषणचा आज चौथा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचे वजनही तीन किलोनं घटलं आहे. अण्णा हजारे यांच्या उपोषणामध्ये सर्वसामान्य जनतेनेही सहभाग नोंदवला आहे.

एक जानेवारी रोजी अण्णांनी मोदींना पाठवलेलं पत्र मिळालं असल्याचं पत्र पंतप्रधान कार्यालयाकडून पाठवण्यात आलं आहे. मात्र, या पत्रात अण्णांच्या मागण्यांच्या पूर्ततेविषयी कुठलाच उल्लेख करण्यात आलेला नाही, तेही अण्णांनी यावेळी आवर्जून सांगितलं. लोकपाल, लोकायुक्तची अंमलबजावणी व्हावी, स्वामीनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव द्यावा, यासह अन्य मागण्यांसाठी अण्णा हजारे यांनी बेमुदत उपोषण पुकारले आहे.

आज शनिवारी सकाळी ११ वाजता राळेगणसिद्धी येथे रस्ता रोको व त्यानंतर जेलभरो आंदोलन करण्यात आले. राळेगणसिद्धीमधील तरुणांनी मोबाइल टॉवरवर चढून अनोखे आंदोलन केले. हातात झेंडे घेऊन कार्यकर्ते टॉवरवर चढले. आंदोलन पहाण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. आंदोलन करणाऱ्या महिला व कार्यकर्त्यांना अटक पलिसांनी अटक केली आहे.