अमेरिकेतील फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्सच्या (एआयए) वतीने साजऱ्या करण्यात येणाऱ्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. हजारे यांनी हे आमंत्रण स्वीकारले असून पुढील महिन्यात या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी अण्णा अमेरिकेस जाणार असल्याची माहिती भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनाच्या कार्यालयाचे समन्वयक दत्ता आवारी यांनी दिली. हजारे यांच्यासमवेत त्यांचे सहकारी व पर्यावरणवादी विश्वंभर चौधरी हेही अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्सच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त दरवर्षी दि. १८ ऑगस्टला ‘इंडियन डे’चे आयोजन केले जाते. त्यानिमित्त न्यूयॉर्क येथे विशेष परेडचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून हजारे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. यापूर्वी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम, प्रसिद्घ चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी येथे हजेरी लावली आहे.  
हजारे यांचे अमेरिकेतील इतर कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असल्याचे विश्वंभर चौधरी यांनी सांगितले. या दौऱ्यासाठी हजारे व चौधरी हे दि. १६ ऑगस्ट रोजी अमेरिकेस रवाना होणार असून हा दौरा दहा दिवसांचा असल्याचेही सांगण्यात आले. यापूर्वी जागतिक बँकेने दिलेला जीत गिल हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी हजारे २००८ मध्ये अमेरिकेस गेले होते. त्यानंतर पाच वर्षांनी ते पुन्हा अमेरिकेस जात आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे स्वयंसेवी संस्थांबाबतचे राजकीय सल्लागार प्रकाश शाह यांनी राळेगणसिद्घीस भेट देऊन हजारे यांच्या कार्याची माहिती घेतली होती.