अण्णा हजारे यांचे पंतप्रधानांना पत्र

घटनेप्रमाणे निवडणूक प्रक्रियेत गोपनीयता राहावी, कोणत्या मतदान केंद्रावर, कोणत्या उमेदवारांना किती मते पडली याची माहिती मिळू नये. अशी माहिती मिळाल्याने उमेदवारांमध्ये संबंधित ठिकाणच्या मतदारांशी सूडाची भावना निर्माण होते, यासाठी उमेदवारांना निवडणुकीत थेट एकूण किती मते मिळाली केवळ याचीच माहिती देणाऱ्या यंत्राचा (टोटलायझर मशिन) वापर करण्याची मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मतदान प्रक्रियेत प्रत्येक ‘ईव्हीएम’मधील मते मोजली जातात, त्याऐवजी एकूण मते मोजणारे यंत्र (टोटलायझर मशिन) बसवले जावे, अशी त्यांची मागणी आहे.

हजारे यांनी यापूर्वीच निवडणूक आयोगाकडे अनेकदा पत्र पाठवून केली होती. हजारे यांची ही मागणी निवडणूक आयोगानेही उचलून धरीत टोटलायझर मशिनची खरेदी करण्याचा अभिप्राय पूर्वीच्या सरकारला दिला होता, मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष

केले. अलीकडेच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये ईव्हिएममधील गडबडीबाबत अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या. त्यावर हजारे यांनी ईव्हिएमवर संशय घेणे चुकीचे असल्याचे स्पष्ट करीत मतमोजणी प्रक्रियेत बदल करण्याच्या मागणीचा पुनरूच्चार केला होता. या पाश्र्वभूमीवर हजारे यांनी आता थेट पंतप्रधानांनाच पत्र पाठवून टोटलायझर मशिनच्या वापराबाबत आग्रह धरला आहे.

आपल्या पत्रात हजारे म्हणतात,की आयोगाने पूर्वीच्या सरकारला टोटलायझर मशिनच्या उपयोगाबाबत पत्रही पाठविले होते, परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. मशिनच्या वापराबाबत विद्यमान  पंतप्रधानांनाही आपण यापूर्वीही पत्र पाठविली आहेत परंतू अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. मतपत्रिकांच्या वापराच्या काळात, मतमोजणी करताना सर्व मतपत्रिका एकत्रित करून मतमोजणी करण्यात येत असे. त्याच पद्धतीप्रमाणे सर्व  ईव्हिएम टोटलायझर मशिनला जोडून एकत्रित निकाल जाहीर करणे गरजेचे आहे. तसे झाले तर कोणत्या मतदान केंद्रावर कोणत्या उमेदवाराला किती मतदान झाले याची माहीती उमेदवारांना समजणार नाही व नि:पक्ष वातावरणात निवडणुका पार पडतील. मतदारांचे मत गोपनीय राहिल. सध्याच्या प्रक्रियेत तसे होत नाही. यासाठी टोटलायझर मशिनचा वापर होणे यातच जनतेचे भले असल्याचे हजारे यांचे मत आहे.