जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची प्रतिक्रिया आली आहे. मला वयोमानानुसार बंदूक पेलणार नाही पण सैनिकांच्या मदतीसाठी मी ट्रक नक्कीच चालवू शकतो असं अण्णा म्हणालेत.

काही दिवसांपूर्वी अण्णांनी लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केले होतं. तब्बल सहा दिवस हे उपोषण सुरू होतं. या उपोषणानंतर अण्णांची प्रकृती खालावली असून सध्या अहमदनगरमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

‘वयोमानानुसार मला बंदूक पेलवणार नाही, पण जर गरज पडली तर देशाच्या रक्षणासाठी लढणाऱ्या आपल्या सैनिकांना पोहोचवण्यासाठी किंवा त्यांच्या मदतीसाठी मी ट्रक नक्कीच चालवू शकतो अशी प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी आपल्या एका जवळच्या व्यक्तीद्वारे प्रसार माध्यमांना दिली.

अण्णा हजारे 1960 मध्ये एक ट्रक ड्रायव्हर म्हणूनच लष्करात सामील झाले होते. 1965 मधील भारत-पाकिस्तान युद्धावेळी ते ‘खेम करन’ या सेक्टरमध्ये तैनात होते.