उत्तर प्रदेशातील हाथरस या ठिकाणी झालेली सामूहिक बलात्काराची जी घटना घडली त्यानंतर देशभरात संताप व्यक्त होतो आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही यावर प्रतिक्रिया देत या प्रकरणातल्या दोषींना फासावर लटकवण्याची मागणी केली आहे. एक पत्रक काढून अण्णा हजारे यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

काय म्हटलं आहे या पत्रकात?

“उत्तर प्रदेशातील हाथरस या गावात घडलेली घटना हे फक्त नराधमांचं दुष्कृत्य नसून माणुसकीला लागलेला कलंक आहे. हाथरस गावात फक्त एका मुलीचा बळी गेला नाही तर माणुसकीचा बळी गेला आहे. भारत हा ऋषी मुनींचा देश मानला जातो. भारताची संस्कृती ही जगातली श्रेष्ठ संस्कृती मानली जाते. अशा देशाची मान शरमेने खाली जाईल असंच हे कृत्य आहे, ही घटना मुळीच चांगली नाही. ज्यांनी कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी घेतली आहे ते ही जबाबदारी पार पाडण्यात अपुरे पडत आहेत. हा विषय निश्चितच चिंतेचा आहे. हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील नराधमांना फासावर लटकवलं पाहिजे”

उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. ही फक्त एका मुलीचीच नाही तर मानवतेची हत्या आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. तसेच बलात्कारासारखे गुन्हे भविष्यात घडू नयेत म्हणून नराधमांना फासावर लटकवण्याचीही मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान हाथरस सामूहिक बलात्काराच्या घटनेचे तीव्र पडसाद देशभरात उमटले आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे दोघेही हाथरस येथील बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना रस्त्यातच अडवण्यात आला. राहुल गांधींना पोलिसांकडून धक्काबुक्की झाल्याचाही आरोप होतो आहे. या घटनेचा निषेध देशभरात करण्यात आला.