मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवून दखल घेतली
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना देण्यात आलेल्या संरक्षणातील त्रुटी त्यांनी स्वत:च निदर्शनास आणून दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली. या त्रुटींबद्दल त्यांनी क्षमाही मागितली आहे. मात्र संरक्षण काढून घेण्याची हजारे यांची मागणी मुख्यमंत्र्यांनी अमान्य करीत सुरक्षाव्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल करण्याचेही आदेश दिले.
हजारे यांना पाठविलेल्या पत्रात मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे, की समाजहितासाठी केलेल्या विविध आंदोलनांमुळे दुखावलेल्या समाजकंटकांपासून आपल्या जीवितास धोका होण्याची शक्यता आहे. या जाणिवेतून आपणास पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.
पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेतील काही उणिवा आणि दोष आपण पत्राद्वारे व्यक्त केल्या आहेत. त्याची गांभीर्याने दखल घेतली आहे. पोलीस संरक्षणावर लक्ष ठेवण्यासाठी जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याबाबत तसेच संरक्षणावरील पोलिसांच्या भोजनाच्या व्यवस्थेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेटी देऊन आपल्या सुरक्षाव्यवस्थेची तपासणी करण्याच्या सूचना आता देण्यात आल्या आहेत. प्रवासात असताना अंगरक्षकांसाठी कायमस्वरूपी एक वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. या व्यवस्थेतील पोलिसांचे वर्तन बेशिस्त असल्याचे निदर्शनास आल्यास त्याची गंभीर दखल घेऊन अशा पोलिसांना तत्काळ बदलण्यात येईल. जनसामान्यांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने परिपूर्ण संरक्षण पुरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न असून, त्यात काही अडचणी आल्यास त्या तत्काळ दूर करण्यात येतील, असे फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे.

पोलीस दोषी
२९ जानेवारी रोजी राज्य गुप्तवार्ता विभागातील उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने राळेगणसिद्धीस भेट देऊन हजारे यांच्या सुरक्षाव्यवस्थेची पाहणी केली होती. यात या व्यवस्थेतील बरेचसे पोलीस मोबाइलवर बोलण्यात व्यस्त असतात, तसेच इतरत्र फिरत असल्याचे उघड झाले होते. या अहवालाची माहितीही फडणवीस यांनी या पत्राद्वारे हजारे यांना दिली आहे.