समाजसेवक अण्णा हजारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते नवाब मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. अण्णा हजारे संघ आणि वकिलांकडून पैसे घेऊन उपोषण करतात, असा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. नवाब मलिकांनी जाहीर लेखी माफी मागावी आणि तसा खुलासा करावा, अन्यथा नवाब मलिकांविरोधात फौजदारी आणि दिवाणी खटले दाखल करावे लागतील अशा स्वरुपाची नोटीस नवाब मलिकांना अण्णा हजारे यांनी पाठवण्यात आली आहे. दरम्यान नवाब मलिक यांनी केलेल्या या आरोपांबद्दल खुद्द अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून, त्यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्या यकृतावर परिणाम झाला आहे. तसंच रक्तदाबाचाही त्रास होऊ लागला आहे. उपोषण सुरुच राहिलं तर किडनी आणि मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो, अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. लोकपाल, लोकायुक्तची अंमलबजावणी व्हावी, स्वामीनाथन आयोगानुसार शेतमालाला दीडपट हमीभाव द्यावा, यासह अन्य मागण्यांसाठी अण्णा हजारे यांनी बेमुदत उपोषण पुकारले आहे.