ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर गंभीर आरोप करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी अखेर आपला माफीनामा सादर केला. अण्णांनी हा माफीनामा स्विकारला असून मलिकांवर पुढील कारवाई थांबवण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याचे सुत्रांकडून कळते.

लोकपाल आणि लोकायुक्तांच्या नियुक्तीसाठी अण्णा हजारेंनी वेळोवेळी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यांच्या या उपोषणावर टीका करताना मलिक यांनी अण्णा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून पैसे घेऊन उपोषणे करतात असा गंभीर आरोप केला होता. याची गंभीर दखल घेत अण्णांचे वकिल अॅड. मिलिंद पवार यांनी मलिक यांच्याविरोधात २ फेब्रुवारी रोजी कायदेशीर नोटीस पाठवली होती.

१ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मलिक यांच्या या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. मात्र, मलिक यांनी स्वतःहून याबाबत कसलाही खुलासा केला नव्हता. त्यामुळे अॅड. मिलिंद पवार यांनी मलिक यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. या नोटिशीनंतर अखेर मलिक यांनी आपला लिखीत माफीनामा सादर केला आहे. यात त्यांनी अण्णांना उद्देशून म्हटले आहे की, यापुढे आपल्याला वाद वाढवायचा नाही. आपण वडिलधारी व्यक्ती आहात, माझ्या वक्तव्यामुळे आपले मन दुखावले गेल्याने मी दिलगिरी व्यक्त करतो.

मलिक यांच्या वक्तव्यामुळे राळेगणसिध्दी परिवारात कमालीचा संताप व्यक्त होत होता. निर्धार परिवर्तनाचा रॅलीसाठी पारनेर तालुक्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना अण्णांना भेटू न देण्याचा निर्णय राळेगणच्या ग्रामस्थांनी केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, मधुकर पिचड यांना अण्णांना भेटता आले नव्हते.