ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सध्या वापरत असलेल्या स्कॉर्पिओ गाडीचा आज लिलाव करण्यात आला. ही गाडी अहमदनगरच्या प्रवीण लोखंडे यांनी ९ लाख ११ हजार रुपयांना विकत घेतली. या स्कॉर्पिओच्या विक्रीनंतर अण्णांसाठी इनोव्हा गाडी घेण्यात येणार आहे. अण्णांच्या स्कॉर्पिओ गाडीसाठी १५ जणांनी बोली लावली होती. मात्र श्रीगोंदा तालुक्यातील देवदेठनचे ग्रामपंचायत सदस्य असलेले प्रवीण लक्ष्मण लोखंडे यांनी ही स्कॉर्पिओ खरेदी केली.
गेल्या अनेक वर्षांपासून अण्णा महाराष्ट्रासह इतर राज्यांमधील दौऱयांसाठी स्वतःची गाडी वापरतात. मात्र, पहिल्यांदाच अशा पद्धतीने त्यांच्या गाडीचा लिलाव करण्यात आला आहे. अण्णांना सध्या पाठदुखीचा त्रास होत असल्यामुळे त्यांनी सध्याची गाडी लिलावात विकून त्यातून मिळालेल्या पैशातून नवी गाडी विकत घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी एकदा अण्णांची गाडी चोरीला गेली होती. त्यानंतर त्यांनी महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ गाडी विकत घेतली. गेल्या सहा वर्षांपासून ही गाडी ते वापरत होते. या काळात दिल्ली आणि इतर ठिकाणी झालेल्या जनआंदोलनांसाठी अण्णांनी याच गाडीने प्रवास केला होता.