राज्यात सत्ता बदल होताच नव्या सरकारने काही हाय-प्रोफाइल नागरिक आणि राजकीय नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे तर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. अण्णा हजारे यांची सुरक्षा वाय प्लसवरुन झेड करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

नारायण राणे यांची वाय प्लस सुरक्षा घटवून त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या समितीने ४५ हाय-प्रोफाइल नागरिक आणि राजकारण्यांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन हे बदल केले आहेत. मुख्य सचिव अजॉय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जैस्वाल, राज्याच्या गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला आणि मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांचा या समितीमध्ये समावेश आहे.

ही समिती दर तीन महिन्यांनी एकदा भेटून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेते. स्थानिक पोलीस स्टेशन, गुप्तचर विभाग आणि स्वतंत्रपणे गोळा केलेल्या माहितीचे विश्लेषण करुन ही समिती कोणाला कितपत धोका आहे त्याचे विश्लेषण करते. आयपीएस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या समितीने ९७ जणांना प्रदान करण्यात आलेल्या सुरक्षेचा आढावा घेतला. “आमच्याकडे झेड प्लस, झेड, वाय आणि एक्स असे चार प्रकारचे सुरक्षा कवच असते. झेड प्लस म्हणजे सर्वात मोठी सुरक्षा.” समितीच्या शिफारशीनुसार, १६ जणांची सुरक्षा काढून घेण्यात आल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.