कोकणातील प्रगतिशील विचारांच्या साहित्याची परंपरा बळकट करण्यासाठी अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाचा उपयोग व्हावा, अशी अपेक्षा १७ आणि १८ जानेवारी २०१५ ला होणाऱ्या सहाव्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. पालिकेच्या बॅ. नाथ पै सभागृह येथील संमेलनस्थळाच्या विचारमंचाला डॉ. नरेंद्र दाभोलकर विचारमंच, तर संमेलननगरीला डॉ. आंबेडकर यांचे गुरू सत्यशोधक कृष्णराव अर्जुन केळुस्कर यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. येथील श्रीराम वाचन मंदिरात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
सहावे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन प्रबोधनात्मक आणि वैचारिक संमेलन व्हावे. समाजातील सर्व घटकांनी त्यात सहभागी व्हावे. त्यातून पुरोगामी विचारांची परंपरा जपली जावी. ज्या अण्णाभाऊ साठेंनी तळागाळातल्या माणसांचे चित्रण साहित्यात आणले, त्यांचे साहित्य नव्या पिढीला कळावे, हा या संमेलनामागचा उद्देश आहे. अण्णाभाऊंनी कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णने लिहिली. फडके, खांडेकर ज्या काळात रोमॅन्टिक कथा, कादंबऱ्या लिहीत होते, त्या काळात अण्णाभाऊ साठे यांनी तळागाळातील माणसाचे जगणे आपल्या साहित्यातून मांडले. वास्तववादी चित्रण प्रथमच मराठी साहित्यात आले. आज आभासी जगात, मालिकांच्या जमान्यात खरेपणा हरवत चालला आहे. माणूस वास्तवापासून दूर जात आहे. अशावेळी वैचारिक परंपरेची उजळणी या साहित्य संमेलनातून व्हावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
कोकणातील आणि एकूण देशभरातील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीवर चर्चा घडवून आणणाऱ्या परिसंवादाचे आयोजन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. संमेलनानिमित्त एक स्मरणिकाही प्रकाशित केली जाणार आहे.
समित्यांची स्थापना
संमेलनाच्या आयोजनासाठी यावेळी विविध समित्यांचीही स्थापना करण्यात आली. यात संयोजन समिती अध्यक्षपदी प्रा. प्रवीण बांदेकर, कार्याध्यक्षपदी अ‍ॅड. संदीप निंबाळकर, कार्यवाह डॉ. गोविंद काजरेकर, खजिनदार हरिहर वाटवे यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून हरिहर आठलेकर, लीलाधर घाडी, रमेश कासकर, विठ्ठल कदम, सुमेधा नाईक, डॉ. शरयू आसोलकर, पराग गावकर, प्रा. विनोदसिंह पाटील, मधुकर मातोंडकर, प्रा. सोमनाथ कदम, प्रा. प्रज्ञाकुमार गावडे, विजय ठाकर, वीरधवल परब यांची निवड करण्यात आली.
स्वागत समितीत नगराध्यक्ष बबन साळगावकर, जयानंद मठकर, प्राचार्य आनंद मेणसे, अ‍ॅड. गोविंद पानसरे, प्रा. पां. ल. येजरे, अप्पाजी गावडे यांचा समावेश करण्यात आला.
निधी समितीत जयानंद मठकर, रमेश बोंद्रे, अ‍ॅड. दीपक नेवगी, अ‍ॅड. सुहास सावंत कुडाळ, आनंद आंधारी कणकवली, प्रा. भिसे वेंगुर्ले, प्रा. आनंद मेणसे बेळगाव, प्रभाकर ढगे गोवा यांची निवड करण्यात आली. स्मरणिका संपादन समितीत वीरधवल परब, डॉ. शरयू आसोलकर, डॉ. अनिल फराकटे, प्रा. मोहन चौगुले, लीलाधर घाडी, डॉ. जी. ए. बुवा, अनिल सरमळकर यांची निवड करण्यात आली. निधी व्यवस्थापन समिती प्रा. एल. पी. पाटील, प्रा. रवींद्र संकपाळ, श्रीमती माधवी शिरसाट, भोजन व्यवस्था- प्रा. शरद शिरोडकर, प्रा. उमेश परब, राजेंद्र कांबळे, अरुण नाईक, निवास व्यवस्था अ‍ॅड. विनायक गणपुले, प्रा. संतोष पाथरवट, ग्रंथदिंडी समितीत भरत गावडे, रमेश कासकर, कल्पना बांदेकर, सुभाष गोयेकर, वंदना करंबेळकर, मनोहर परब, टी. एन. सावंत, कार्यक्रम व्यवस्था समितीत प्रा. सुमेधा नाईक-धुरी, विठ्ठल कदम, प्रा. विनोदसिंह पाटील, नीलम बांदेकर यांची निवड करण्यात आली.