साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय व्याख्यानमाला येथे २७ व २८ एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेचे प्रमुख व अण्णाभाऊ सेनेचे राज्य अध्यक्ष संजय गालफाडे यांनी दिली.
ज्यांच्या साहित्यामध्ये वारणेच्या खोऱ्यापासून मुंबईच्या कामगारापर्यंत जनजीवन चित्रित झाले, ज्या काळात काल्पनिक व शृंगारिक साहित्याची चलती असताना सर्वप्रथम वास्तवाचे भान ठेवून लिहिणारे साहित्यिक अण्णाभाऊ साठे होते. अण्णाभाऊंच्या विचारापासून प्रेरणा घेऊन स्थापन झालेल्या अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेच्या वतीने समाजप्रबोधन व्हावे या हेतूने अण्णाभाऊ साठे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व  महापौर अ‍ॅड. यतीन वाघ यांच्या हस्ते या व्याख्यानमालेचे उद्घाटन येथील अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या कार्यक्रमास पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री लक्ष्मण ढोबळे, खा. समीर भुजबळ, आ. ए. टी. पवार, आ. हेमंत टकले, नगरसेवक गुरुमित बग्गा, उपमहापौर सतीश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पहिले व्याख्यान ‘सामाजिक परिवर्तनामधील अण्णाभाऊंचे योगदान’ या विषयावर साताऱ्याचे प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांचे तर दुसऱ्या दिवशी २८ एप्रिल रोजी महिलांचे ज्वलंत विषय महाराष्ट्रभर मांडणाऱ्या प्रा. सुशीला मोराळे या ‘दलित आदिवासी, मागासवर्गीय महिलांचे आर्थिक, सामाजिक व राजकीय स्वातंत्र्य’ या विषयावर मत मांडतील. साहित्य परिषदेचे राज्य अध्यक्ष विठ्ठल भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली या व्याख्यानमालेचा समारोप होईल. सर्वानी या व्याख्यानमालेस उपस्थित राहण्याचे आवाहन साहित्य परिषदेचे प्रमुख व अण्णाभाऊ सेनेचे राज्य अध्यक्ष गालफाडे यांनी केले आहे.