मांढरदेव (ता.वाई) येथील यात्रेत करणीच्या करण्याच्या नावाखाली झाडाला खिळे बिबे, लिंबू व काळ्या बाहुल्या फोटोसह ठोकणाऱ्यांवर व जादूटोणा करणाऱ्यांवर कायद्यानुसार गुन्हा दाखल करा, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.

मांढरदेव येथील काळेश्वरी देवीची यात्रा गुरुवार ( दि. ९) पासून सुरु होत आहे. गडावर या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक येत असतात. यावेळी करणीच्या नावाने जर कोणी अशाप्रकारे बाहुल्या, फोटो लावणाऱ्यांवर “जादुटोणा कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात यावा. या ठिकाणी नरबळी सारखेही प्रकार घडू शकतात.त्यामुळे प्रशासनाने वेळीच याचा बंदोबस्त करावा. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने मांढरदेव येथील काळेश्वरी देवीची ९ ते ११ जानेवारी दरम्यान यात्रा असते. यात्रा कालावधील परिसरातील झाडांना करणीच्या नावाने काळ्या बाहुल्या, टाचण्या टोचलेला एखाद्या व्यक्तीचा फोटो, चिठ्ठ्या, बिब्वे व लिंबु खिळ्याच्या व दाभणाच्या साहाय्याने झाडाला ठोकले जातात. एवढेच नाहीतर जिवंत कोंबड्यांना दोरीच्या सह्ययाने झाडाला देखील लटकवले जाते, याचा प्रत्यक्ष पुरावाच सातारा पुणे येथील ‘अंनिस’ने आज मांढरदेव गडावर जाऊन गोळा केला.

अशा या प्रकाराला आळा बसणे गरजेचे आहे. अशा गोष्टी करणार्‍यावर कारवाई केली जाईल, असा बोर्डही देवस्थान मार्फत लावण्यात आला आहे. मंदिराच्या ट्रस्टींसह स्थानिक प्रशासनाकडून देखील याबाबत जागृती करणे आवश्यक आहे. करणीच्या नावाने लोकांना फसवले जाते, त्यामुळे या ठिकाणी अंधश्रध्दा पसरते. याला आळा बसण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने पुणे आणि सातारा जिल्ह्याचे कार्यकर्ते प्रशांत पोतदार राज्य प्रधान सचिव नंदिनी जाधव (पुणे जिल्हा,कार्याध्यक्ष), सुभाष सोळंखी, भगवान रणदिवे, वंदना माने, राम सर्वगोड, भगवान काळभोर, श्रीराम नलावडे, अॅड.धुमाळ या सर्वांनी झाडाला ठोकलेल्या काळ्या बाहुल्या, फोटो, खिळे, दाभण इत्यादी साहित्य दोन पोती भरून काढुन त्याचे दहन केले. भाविकांनी अशा गोष्टींना बळी पडून आपले मानसिक व आर्थिक शोषण होऊ देऊ नये असे, आवाहन अंनिसने केले आहे.