जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासह दुष्काळासंदर्भातील विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी आज, सोमवारी सकाळी जिल्हाधिका-यांची भेट घेऊन निवेदन दिले. जनावरांसाठी छावण्या व चारा डेपो त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलनाचाही इशारा देण्यात आला.
पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू करण्याचे अधिकार तालुका पातळीवर द्यावेत, उभ्या पिकांचे त्वरित पंचनामे करून १०० टक्के नुकसान भरपाई द्यावी, शेतक-यांचे कर्ज व शेतीपंपाचे वीजबिल माफ करा, मुळा, भंडारदरा, कुकडी, गोदावरीचे आवर्तन तातडीने सोडावे, दुधाला ३० रुपये हमीभाव द्यावा, जिल्हय़ात कृत्रिम पाऊस पाडावा, विद्यार्थ्यांचे परीक्षा व शैक्षणिक शुल्क माफ करावे, रोहयोची कामे तातडीने सुरू करावीत आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, आ. वैभव पिचड, आ. राहुल जगताप, आ. संग्राम जगताप, जि.प. अध्यक्ष मंजूषा गुंड, दादा कळमकर, सभापती नंदा वारे, सिद्धार्थ मुरकुटे, सुजित झावरे, सचिन जगताप, कपिल पवार, डॉ. मेधा कांबळे, सोमनाथ धूत आदी या वेळी उपस्थित होते. पदाधिका-यांनी चर्चेत जिल्हय़ात पुरेसा चारा उपलब्ध असल्याच्या शक्यतेवर आक्षेप घेतला. टंचाई परिस्थितीमुळे निवडणुका पुढे ढकलल्या जात असताना जिल्हा टंचाईग्रस्त का जाहीर केला जात नाही, अशीही हरकत घुले यांनी नोंदवली.
नगर व भिंगारलगतच्या भागात गवळी समाज मोठा आहे, ते दूधधंद्यात आहेत. त्यांच्यासाठीही चारा डेपो व छावण्या सुरू करण्याची मागणी कळमकर यांनी केली.
छावण्या व चारा डेपोंसाठी फेरसर्वेक्षण
जिल्हय़ात पुरेसा चारा उपलब्धतेवर हरकत घेण्यात आल्याने जिल्हाधिकारी कवडे यांनी पशु व कृषी विभागाला दक्षिण भागात किती चारा उपलब्ध आहे, याबद्दल फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. चाऱ्याची उपलब्धता पाहिल्यानंतरच छावण्या व चारा डेपोसंदर्भात सरकारला प्रस्ताव पाठवला जाईल, असे कवडे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. या दोन्ही विभागांनी जिल्हय़ात ७१ लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध असल्याचा अहवाल दिला आहे, मात्र पदाधिका-यांनी दक्षिण भागात आवश्यक तेवढा उपलब्ध नाही, अशी हरकत घेतली. कुकडीतून चार तालुक्यांसाठी ६९६ एमसीएफटी पाणी सोडण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मुळा, भंडारदरा व गोदावरीतून आवर्तन सोडण्यासाठी लवकरच कालवा समित्यांच्या बैठका आयोजित करण्याचे कवडे यांनी मान्य केले.