सातारा जिल्ह्यात करोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी १७ ते २६ जुलै दरम्यान पुन्हा एकदा टाळेबंदीची घोषणा झाली आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ही माहिती दिली.

सातारा जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. ही परिस्थिती नियंत्रणात न आल्यास पुन्हा टाळेबंदी जाहीर करावी लागेल असे जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच सांगितले होते. सुरुवातीला त्यांनी बाजारपेठ व दुकानांच्या वेळा कमी केल्या होत्या. तरीही करोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सातारा जिल्ह्यात टाळेबंदी लागू केली आहे.

जिल्ह्यात १७ ते २२ जूलै दरम्या टाळेबंदीची कडक अंमलबजावणी होणार असून २२ ते २६ जुलै या काळात त्यात थोडी शिथिलता आणण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हंटले आहे. या आदेशानुसार, सर्व किराणा दुकाने, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, सर्व इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने १७ ते २२ जुलैपर्यंत पूर्णत: बंद राहतील. त्यानंतर २२ ते २६ जुलै या कालावधीत सकाळी नऊ ते दुपरी दोन वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी दुकाने व त्यांचे ठोक विक्रेते यांची दुकाने सुरु राहतील. इतर सर्व दुकाने व व्यवसाय बंद राहतील असेही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटले आहे.

वाढता करोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत अधिक प्रयत्न करावेत. प्रतिबंधित क्षेत्रात शासनाच्या निर्देशानुसार कठोर कारवाई करावी. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी. सर्व मार्ग टाळेबंदी काळात बंद राहतील असेही जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्याचे अधिकार यापूर्वीच सातारा जिल्ह्यातील संबधित उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जिल्ह्यात सोमवार रात्री पर्यंत १,८४५ बाधित असून १,०६६ करोनामुक्त झाले आहेत. तर ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. मागील दहा दिवसात जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.