मनमाड व अहमदनगरसाठी सोडण्यात आलेल्या पाण्यासाठी निफाड तालुक्यातील नदी व कालव्या लगतच्या गावांचा बंद करण्यात आलेला वीजपुरवठा तात्काळ सुरू करण्यात यावा यांसह इतर मागण्यांसाठी आ. अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी निफाड तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला. मागणी मान्य होत नाही तोपर्यंत सुमारे अडीच तास मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या दिल्याने अखेर प्रांताधिकाऱ्यांना वीजपुरवठा सुरू करण्यात येत असल्याचे सांगावे लागले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
निफाड बाजार समिती सभागृहापासून मोर्चाला सुरुवात झाली. उपस्थित शेतकऱ्यांकडून आमचा वीजपुरवठा तात्काळ सुरू करण्यात यावा अशा घोषणा देण्यात येत होत्या. मोर्चा तहसील कार्यालयावर आल्यावर शिवसेनेचे नंदू सांगळे, भागवत बाबा बोरस्ते यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. आ. कदम यांनी  परीक्षा कालावधीत विद्युतपुरवठा बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याचा मुद्दा मांडला. आठ दिवसांपसून गोदाकाठ व कालव्यालगत असलेले रोहित्र बंद करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना जनावरांना पाणी पाजणेही मुश्कील झाले आहे. शेतकऱ्यांकडे तीन अश्वशक्तीचा पंप असताना त्यांना वीज कंपनीतर्फे पाच अश्वशक्तीची बिले देण्यात आली. त्यामुळे बिल न भरणाऱ्या काही शेतकऱ्यांचा विद्युतपुरवठा कंपनीकडून बंद करण्यात आला. ही बिले पुन्हा तीन अश्वशक्तीची करण्यात यावीत अशी मागणीही आ. कदम यांनी केली. उपकेंद्राच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी त्वरित ऐकून घ्याव्यात, उर्मटपणाची भाषा यापुढे सहन केली जाणार नाही. जोपर्यंत बंद केलेले रोहित्र सुरू केले जात नाही तोपर्यंत तहसील कार्यालयासमोरून आपण हलणार नाही, अशी भूमिका घेत आ. कदमांसह मोर्चकऱ्यांनी ठाण मांडले.
प्रांत सरिता नरके व विद्युत अभियंत्यांनी तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून मोर्चेक ऱ्यांच्या भावना कळविल्या. अडीच तास ठिय्या आंदोलन सुरू राहिल्यानंतर प्रांताधिकारी व अभियंत्यांनी गुरुवारपासून वीजपुरवठा सुरू करण्याचे आश्वासन दिले. परंतु मोर्चेकऱ्यांनी आताच निर्णय घेण्याची मागणी केल्याने अखेर विद्युतपुरवठा सुरू करण्याची घोषणा प्रांताधिकाऱ्यांनी केल्यावर मोर्चेकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.