13 August 2020

News Flash

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात आणखी ८ करोनाबाधित रुग्ण

सहाजण ठाणे-मुंबईहून आलेले चाकरमानी

संग्रहित छायाचित्र

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात शनिवारी आणखी ८ जणांचे करोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असून त्यापैकी सहाजण ठाणे-मुंबईहून आलेले चाकरमानी आहेत.

या नवीन ८ रुग्णांमध्ये ४ महिला व ४ पुरुषांचा समावेश आहे. या सर्वाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत असून जिल्ह्य़ातील आतापर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या १६ झाली आहे. यातील ५ रूग्ण तंदुरुस्त होऊ न घरी गेले आहेत, तर ११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे सांगण्यात आले.

गेल्या २४ तासांत निष्पन्न रुग्णांपैकी कणकवली तालुक्यातील ६ जण, तर वैभववाडी आणि मालवण तालुक्यातील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे. कणकवली तालुक्यातील डांबरे येथील ४ रूग्ण, कणकवली शहरातील ढालकाठी येथील २, मालवण तालुक्यातील हिवाळे येथील १ तर वैभववाडी  तालुक्यातील नाधवडे येथील १ रुग्णाचा यात समावेश आहे.

कणकवली येथील ४ रुग्णांनी मुंबई येथून प्रवास केला आहे. मालवण तालुक्यातील रूग्ण ठाणे येथून आलेला आहे. वैभववाडी तालुक्यातील रूग्ण प्रभादेवी मुंबई येथून आलेला आहे. तर दोन व्यक्तींनी रत्नागिरी जिल्ह्य़ातील लांजा येथून प्रवास केला आहे.

जिल्ह्य़ात एकूण १६ हजार ३७८ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्यापैकी ५१५ व्यक्ती या शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. १५ हजार ८६३ व्यक्तींना गावपातळीवरील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण १ हजार ३०७ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी १ हजार १५० तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील १६ अहवाल पॉझिटीव्ह आले असून उर्वरीत १ हजार १३४ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून १६५ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या ८५ रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी ५२ रुग्ण डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये, ३३ रुग्ण डेडिकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत शनिवारी ४ हजार ९९६ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.

परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्य़ामधून सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात २ मेपासून २३ मेअखेर एकूण ३६ हजार ६२८ व्यक्ती दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये खारेपाटण चेकपोस्ट येथून २६ हजार ९३५, फोंडा -१ हजार ९६३ , करुळ – ३ हजार ३२० , आंबोली – १ हजार ५८७ , बांदा – १ हजार ७४०, दोडामार्ग – ७८३ व्यक्तींनी जिल्ह्य़ात प्रवेश केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2020 1:01 am

Web Title: another 8 corona patients in sindhudurg district abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 टंचाईच्या झळा वाढल्या; ८४ टँकरने पाणीपुरवठा
2 अकोला तालुक्यात करोनाचा पहिला रुग्ण
3 लातूरमध्ये करोनाचे ७९ रुग्ण
Just Now!
X