News Flash

रत्नागिरी जिल्ह्यातील आणखी एक करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू

जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या तीन

संग्रहित छायाचित्र

मुंबईहून गुहागर तालुक्यात आल्यावर मरण पावलेली एक व्यक्ती करोनाबाधित असल्याचे तपासणीमध्ये निष्पन्न झाल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या मृत्यूंची संख्या तीन झाली आहे.

याचबरोबर जिल्ह्यात आलेल्या चाकरमानींपैकी पाचजणांचे तपासणी अहवाल सकारात्मक आल्यामुळे मंगळवारअखेरपर्यंत जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५२ झाली आहे. त्यापैकी  ५ जण पूर्णपणे तंदुरुस्त होऊन घरी गेले असून तिघांचा मृत्यू झाला आहे.  मंगळवारी सकाळी आलेल्या १६ जणांच्या तपासणी अहवालापैकी दापोलीतील ३ आणि गुहागरमधील २ अशा पाचजणांचे अहवाल सकारात्मक आले.

गुहागर तालुक्यातील जामसूत येथील मृत्यू पावलेली एक व्यक्ती शुक्रवारी मुंबईहून रुग्णवाहिकेने गेल्या गुरुवारी रात्री गावी आली. त्या व्यक्तीसोबत काळजीवाहक आणि भाऊ  होते.

भाऊ खासगी रुग्णवाहिकेने परत मुंबईला गेला. हा रुग्ण आणि त्याचा काळजीवाहक जामसुतला स्वतंत्र घरात रहात होते. ग्राम कृती दलाने ही माहिती आरोग्य विभागाला शुक्रवारी दिली. त्यामुळे दोघांचे स्वॅब घेण्यात आले. रविवारी सायंकाळी त्या रुग्णाचा मृत्यू झाला.

यकृताची व्याधी असल्याने त्याला ताप येत होता. त्यामुळे आरोग्य विभाग स्वॅबचा अहवाल आला नसला तरी त्या रुग्णाकडे करोनाचा संभाव्य रुग्ण म्हणूनच पाहिले जात होते. त्यामुळे रुग्णाची काळजी घेण्यासंदर्भातील सूचनांची काटकोर अंमलबजावणी केली जात होती. रविवारी या रुग्णावर अंत्यसंस्कार करताना पीपीई कीट घालूनच त्याचा देह स्मशानात नेण्यात आला होता. रुग्ण आणि काळजीवाहकाच्या स्वॅबचा अहवाल मंगळवारी आल्यावर दोघेही करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला असला तरी जामसुत गावापासून ३ किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला आहे. या रुग्णाचा काळजीवाहक म्हणून काम करत असलेल्या ५० वर्षीय व्यक्तीला (मूळ गाव पालशेत) करोना आजारावरील उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मृत व्यक्तीची पत्नी मुंबईला राहते. खासगी वाहन चालक, काळजीवाहक आणि अंत्यसंस्काराला आलेल्या व्यक्तींची माहिती प्रशासन गोळा करीत आहे.

दरम्यान दापोली तालुक्यातील तीन जण करोनाबधित असल्याचा अहवाल मंगळवारी  आला असून या तालुक्यातील करोनाबधित रुग्णांची एकूण संख्या आता ८ झाली आहे. ३ मे रोजी मुंबईहून दापोली येथे आलेल्यांचे शहरातील नवभारत छात्रालयात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले होते. या सर्वाचे स्वॅबचे नमुने घेऊन मिरज येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते . त्याचा अहवाल येण्याअगोदरच तालुका प्रशासनाने सोमवारी सर्वांना त्यांच्या गावी पाठवले होते. हा अहवाल आल्यावर त्यांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असून तेथे पुढील उपचार करण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 12:11 am

Web Title: another corona patient dies in ratnagiri district abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 कुटुंबावर प्राणघातक हल्ला ;महिलेचा जागीच मृत्यू
2 मजुरांसाठी बससंख्या दुप्पट करण्याची मेधा पाटकर यांची मागणी
3 सोलापुरात करोनाचे आणखी दोन बळी; रुग्णसंख्या २७७
Just Now!
X