कुंभमेळ्यात त्र्यंबकनगरीतील ज्या तीर्थात साधू-महंत शाही स्नानाचा पवित्र योग साधणार आहेत, त्या कुशावर्त तीर्थासह शिव मंदिरावर आपला मालकी हक्क सांगणाऱ्या देवस्थानच्या विरोधात साधू-महंतांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. सिंहस्थ काळात शिव मंदिर आणि कुशावर्त तीर्थ प्रशासनाने ताब्यात घ्यावे, अशी मागणी शैवपंथीय आखाडय़ांनी केली आहे. या संदर्भात देवस्थानच्या विश्वस्तांनी साधू-महंतांशी कोणताही वाद नसून त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाने गैरसमज होतील असे वातावरण तयार केल्याचा आरोप केला. सिंहस्थ पर्वणीच्या काळात शाही स्नान आणि साधू-महंतांना मंदिरातील दर्शन यांच्यात ताळमेळ साधला जावा यासाठी देवस्थान आणि साधू-महंतांची १९ जुलै रोजी संयुक्त बैठक होणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करताना त्र्यंबकेश्वर देवस्थानला विश्वासात घेतले जात नसल्याचा आक्षेप एका विश्वस्ताने नगरपालिकेत झालेल्या बैठकीत नोंदविला होता. १२ ज्योतिर्लिगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वरचे शिव मंदिर आणि लगतचे कुशावर्त तीर्थ देवस्थानच्या मालकीचे आहे. आमच्या मालकीच्या जागेवर धार्मिक उपक्रमाचे नियोजन करताना देवस्थानला विचारात घेतले जात नाही. पुरोहित संघाचा कोणताही संबंध नसताना त्यांच्यामार्फत हस्तक्षेप केला जातो, अशी तक्रार मांडण्यात आली. या विधानाचे पडसाद सिंहस्थ कुंभमेळ्यास सुरुवात होत असताना उमटले. अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्रगिरी महाराज यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या बैठकीत १० आखाडय़ांच्या महंतांनी जोरदार आक्षेप नोंदविला. देवस्थानच्या विश्वस्तांनी अतिशय बेजबाबदारपणे विधान केले. देव सर्वाचा असतो. त्याच्यावर कोणी आपली मालकी गाजवू शकत नाहीत. विश्वस्त कधी देवस्थानचे मालक होत नाहीत. देवस्थानच्या कार्यशैलीत फरक न पडल्यास शासन व प्रशासन कठोर पाऊल उचलेल असे बैठकीत सूचित करण्यात आले.
दरम्यानच्या काळात तपोनिधी आनंद आखाडय़ाचे भगवान बाबा यांनी सिंहस्थ काळासाठी शिव मंदिर आणि कुशावर्त तीर्थ प्रशासनाने ताब्यात घ्यावे अशी मागणी केली. त्यास इतर महंतांनी पाठिंबा दिला. विश्वस्तांच्या आक्षेपामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याची बाब संबंधितांनी निदर्शनास आणून दिली. साधू-महंतांच्या मागणीमुळे या विषयावर प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्यास सुरुवात केली. या घडामोडी घडत असताना साधू-महंतांशी संयुक्तपणे चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्याची तयारी देवस्थानने केली आहे. देवस्थानचा साधू-महंतांशी कोणताही वाद नाही. पुरोहित संघाने दिशाभूल करणारी माहिती पसरविली. शाही स्नानानंतर साधू-महंत दर्शनासाठी मंदिरात येतात. त्यांचे स्नान आणि दर्शनाची वेळ यांच्यात ताळमेळ बसविण्याबाबत चर्चा होणार असल्याचे संबंधित विश्वस्ताने सांगितले. साधू-महंत आणि देवस्थान यांच्यात पुरोहित संघाने गैरसमज निर्माण केल्याचा आरोपही संबंधिताने केला.