सोलापूर : सोलापुरात शिवसेनेला गळती लागण्याचे संकेत स्पष्ट होत असून सेनेचे माजी महापौर महेश कोठे यांच्या पाठोपाठ माजी आमदार दिलीप माने हे देखील शिवसेनेचे शिवबंधन सैल करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचे चित्र समोर आले आहे. शहर व जिल्ह्यात राष्ट्रवादीने स्वत:ची ताकद वाढविण्यासाठी भरती सुरू केल्याचे बोलले जाते.

सोलापूर महापालिकेच्या राजकारणात स्वत:चा मोठा प्रभाव टिकवून ठेवणारे कोठे हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस पक्षाचे आहेत. परंतु काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची साथ सोडून २०१४ साली आमदारकीचे स्वप्न साकार करण्यासाठी हाताच्या मनगटावर शिवसेनेचे शिवबंधन बांधले होते. परंतु काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडून कोठे यांना पराभव पत्करावा लागला होता. महापालिकेत शिवसेना सदस्यांचे बळ २१ पर्यंत वाढवून कोठे यांनी पुन्हा विधानसभा निवडणुकीत भवितव्य अजमावून पाहिले. मागील २०१९ सालच्या सोलापूर शहर मध्य मतदार संघात महेश कोठे हे शिवसेनेची उमेदवारी पुन्हा मिळण्याबाबत आत्मविश्वास बाळगून होते. परंतु त्याचवेळी राजकारणात आयाराम-गयारामांची वर्दळ वाढली आणि तत्कालीन काँग्रेसचे माजी आमदार दिलीप ब्रह्मदेव माने यांनी स्वत:चे राजकीय भवितव्य सुरक्षित राहण्यासाठी काँग्रेसची साथ सोडून थेट शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेना प्रवेशामागे त्यांचाही डोळा आमदारकीवर होता. त्या वेळी महेश कोठे यांना शेवटच्या क्षणी डावलून दिलीप माने यांना शिवसेनेची उमेदवारी मिळाली. त्यामुळे कोठे यांना सेनेच्या विरोधात बंडखोरी करावी लागली. त्या वेळी लढतीत माने व कोठे हे दोघेही पराभूत झाले आणि काँग्रेसच्या प्रणिती शिंदे सलग तिसऱ्यांदा आमदार झाल्या.

गेल्या दोन वर्षांत सोलापुरातील राजकीय स्थित्यंतरे बदलत चालली असून सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादीने स्वत:ची ताकद वाढविण्याचा चंग बांधला आहे. त्यातूनच सेनेचे महेश कोठे यांचे सोलापूर महापालिकेच्या राजकारणातील महत्त्व जाणून घेत राष्ट्रवादीने त्यांच्या हाती ‘घडय़ाळ’ बांधण्यासाठी मुहूर्त शोधणे सुरू केले. कोठे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची आता केवळ औपचारिकता शिल्लक राहिल्याचे बोलले जाते.

याच पार्श्वभूमीवर साखर कारखाना, शिक्षण संस्था, सहकार, बँकिंग, कृषिउत्पन्न बाजार समिती आदी क्षेत्रांत मोठा दबदबा राखून असलेले सेनेचे माजी आमदार दिलीप माने यांनाही राष्ट्रवादीचे वेध लागले आहेत. गेल्या वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मर्जीनेच दिलीप माने यांची सोलापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी वर्णी लागली होती. अर्थात नंतर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त झाले. मात्र या निमित्ताने माने हे अजित पवार यांच्या जवळ गेले असतानाच गुरुवारी सकाळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलीप माने यांच्या ‘सुमित्रा’ बंगल्यावर सदिच्छा भेट देऊ न त्यांचा पाहुणचार घेतला. या वेळी राजकीय गप्पांसह गोपनीय चर्चाही झाल्याचे सूत्रांनी सांगितले.