मोबाईल सीमकार्डचा गैरवापर होऊ नये, तसेच सीमकार्ड घेताना कागदपत्रे देऊन खात्री करूनच ते वापरले पाहिजे. मात्र, दुसऱ्याच्या कागदपत्रांचा वापर करून सीमकार्डची विक्री करण्याचा डाव गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उधळून लावला.
आसीफ मोहम्मद इक्बाल मोहम्मद पाटणी (वय ३४, मुनव्वर मंजिल, कटकटगेट) यांची कागदपत्रे वापरून, त्यांच्या नावाने बनावट सही करून ८४८४०९९५७३ हे युनिनॉर कंपनीचे सीमकार्ड एस. के. इमरान सीम मोबाईल (आर. जी. फंक्शन हॉलसमोर, औरंगाबाद) या दुकानातून २ जानेवारीला विक्री झाल्याचे कागदपत्रांवरून दिसून आले. मात्र, हा क्रमांक आपला नसून तो आपल्या नावावरही नसल्याचे, कागदपत्रांवर सही दुसऱ्यानेच केल्याचे व आधार कार्डची झेरॉक्स मात्र आपलीच असल्याचे पाटणी यांनी पोलिसांना सांगितले. पाटणी यांच्या फिर्यादीनुसार संबंधित दुकानचालकाविरुद्ध सिटी चौक पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
दरम्यान, मोबाईलचे नवीन सीमकार्ड घेताना कागदपत्रांबाबत पूर्ण खात्री करूनच ते घ्यावे. ज्या व्यक्तीची कागदपत्रे आहेत, त्यालाच ते विक्री करावे. हे सीमकार्ड घेणाऱ्यांनी स्वत:च्या किंवा अगदी जवळच्या नातेवाईकाच्या नावावर ते खरेदी करावे अन्यथा त्याच्याविरुद्ध कारवाई होऊ शकते, असा इशारा पोलीस आयुक्तालयाच्या वतीने देण्यात आला आहे.