वाहनचालक, भाजी विक्रेता अशा कष्टक ऱ्यांच्या मुलांची ती शाळा. घरी शिक्षणाचा अंधार पण तरीही या मुलांनी शिकावे, मोठे व्हावे या हेतूने या शाळेनेच या मुलांसाठी प्रयत्न सुरू केले आणि या यंदाच्या दहावी परीक्षेत या शाळेचाही निकाल ९७.६७ टक्के इतका लागला आहे. ही यशोगाथा आहे, कोल्हापूरच्या आंतरभारती शाळेची.
इचलकरंजीतील लालनगर, नेहरूनगर, जाधव मळा हा कष्टकऱ्यांचा भाग म्हणून ओळखला जातो. येथे राहणारे लोकही दलित, भटके, इतर मागास, विशेष मागास अशा घटकांतील आहेत. शिक्षणाची पाश्र्वभूमी नसलेल्या आणि सर्वार्थाने मागासलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी ‘आंतरभारती’ हा एकमेव आधार वाटत असतो. विद्यार्थ्यांची ही पाश्र्वभूमी लक्षात घेऊन आंतरभारतीचे व्यवस्थापन व शिक्षकही विद्यार्थ्यांची शैक्षणिकदृष्टय़ा गुणात्मक वाढ व्हावी यासाठी प्रयत्नशील असतात. त्यासाठी वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम राबवले जातात. या मुलांच्या सराव परीक्षा घेतल्या जातात. याची परिणती म्हणून यंदा दहावीच्या परीक्षेत या प्रशालेचा निकाल ९७.६७ टक्के इतका लागला असल्याचे मुख्याध्यापिका एस.टी. भागवत यांनी सांगितले.
इथल्या मुलांकडे अनेकदा पुस्तके नसतात, शालेय साहित्य मिळत नाही, खासगी शिकवणी तर दूरची गोष्ट आहे. अशा वेळी या शाळेतर्फेच या मुलांसाठी खटपट केली जाते. शाळेचे योग्य नियोजन, शिक्षकांची मेहनत यामुळे हे विद्यार्थीही अभ्यासात चमकतात. यंदाही या शाळेतील मुलांनी मोठे यश संपादन केले आहे. शंतनू पाटील याचे वडील रामचंद्र पाटील हे ग्रंथपाल म्हणून काम करतात. ८७.४० टक्के गुण मिळवून शाळेत दुसऱ्या स्थानी आलेल्या मनोज बुचडे याचे वडील रिक्षा चालक आहेत. टेंपो चालक असलेल्या चंद्रकांत रावळ यांचा मुलगा रोहन याने परिश्रमाच्या जोरावर ९७.२० टक्के गुण मिळवले. याच प्रशालेत शिक्षक असेलेल्या एस.डी. िशदे यांच्या ऋषिकेश या पाल्याने ९५.६० टक्के गुण मिळवले. राजनंदिनी घोडके हिचे वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. तिने ९०.६० टक्के गुणांची कमाई केली तर वडील ट्रक चालक असणाऱ्या स्वॉलीहा बागवान हिने कष्टातून ९०.२० टक्के गुण मिळवले आहेत. धवल यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे वैद्यकीय, स्पर्धा परीक्षा, अभियांत्रिकी, वाणिज्य या क्षेत्रात करीअर करायचे आहे.
आंतरभारती विद्यालयाकडून या गुणी विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य करण्याची देखील परंपरा आहे. त्यातून पाटील, बुचडे, रावळ, िशदे या विद्यार्थ्यांना प्रत्येकी अकरा हजार तर घोडके, बागवान यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांचा आंतरभारती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, असे संस्थेचे अध्यक्ष शामराव नकाते यांनी सांगितले.