२०१९ मधील निवडणुकांत भाजपाला रोखण्याबाबत रणनीती ठरवण्यासाठी विरोधीपक्षांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली. यावेळी शरद पवारांनी त्यांना एक मंत्र दिला, भाजापाविरोधात एकत्र यायचं असेल तर काँग्रेसचा विरोध सोडावा लागेल असे त्यांनी म्हटले होते. काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय भाजपाला रोखण्याचा कार्यक्रम राबवता येणे कठीण असल्याचे त्यांचा मतितार्थ होता.

पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपाला रोखण्यासाठी सर्वच विरोधी पक्षांनी मोट बांधायला सुरुवात केली आहे. त्यासाठी एकीकडे भाजपा आणि काँग्रेसला बाजूला ठेवत तिसरी आघाडीसाठी प्रयत्न होत आहेत. तर, काहीजण काँग्रेसच्यासाथीने भाजपाला सत्तेपासून रोखण्याची तयारी करीत आहेत. दरम्यान, सर्वच विरोधी पक्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार हे सर्वात वरिष्ठ नेते आहेत. राजकारणात त्यांचा ५० वर्षांचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे ते या निवडणुकीसाठी महत्वाची भुमिका बजावणार आहेत.

देशाला काँग्रेसची गरज आहे, याला दुसरा मार्ग नाही. ज्या राज्यांमध्ये काँग्रेस कमजोर आहे, त्या ठिकाणीही तो राष्ट्रीय पक्ष म्हणून अस्तित्वात असतो त्यामुळे सर्व भारतीय स्थानिक पक्षांपर्यंतही पोहोचू शकत नाहीत, असे पवार विरोधकांशी झालेल्या चर्चेत म्हणाले होते. २०१९च्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी पवार यांची नुकतीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, तृणमुल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी आणि तेलगू देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू यांनी भेट घेतली होती.

शरद पवार हे मुळचे काँग्रसेच आहेत, त्यामुळे त्यांचा काँग्रेसवर विश्वास आहे. त्याचबरोबर त्यांना स्थानिक पक्षांची ताकदही माहिती आहे. त्यामुळे स्थानिक पक्षांनी काँग्रेसला साथ दिल्यास देशात बदल घडू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे. समाजवादी पार्टी (सपा), बहुजन समाज पार्टी (बसपा), तृणमुल काँग्रेस (टीएमसी) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (एनसीपी) या प्रादेशिक पक्षांना त्यांच्या भूमीत कमी लेखण्यात येऊ नये, हीच चूक काँग्रेसकडून झाल्याने त्यांना हार पत्करावी लागल्याचे पवार यांनी एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याशी बोलताना म्हणाले होते.

कर्नाटकात काँग्रेसची चांगली ताकद आहे त्यामुळे भाजापाविरोधी पक्षांनी आपले अनावश्यक उमेदवार येथील निवडणूक रिंगणात उतरवू नये असेही त्यांनी सुचवले आहे. त्यामुळे भाजपाला आगामी काळात रोखण्यासाठी विरोधकांनी मुलभूत गोष्टींवर काम सुरु केल्याचे चित्र आहे.