मालेगावचे प्रांताधिकारी संदीप पाटील, शिरस्तेदार हर्षल गायधनी आणि वरिष्ठ लिपिक नाना बागडे यांना सव्वादोन लाख रुपयांची लाच घेताना बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांनी रंगेहाथ पकडले. तक्रारदाराने लाचेची रक्कम लिपिक बागडे यांच्याकडे दिली. मात्र, या तिघांसाठी मिळून ही लाच देण्यात आल्याची तक्रार त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली आहे. त्यामुळे अधिकाऱय़ांनी या तिघांनाही ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे.
तिन्ही अधिकाऱयांविरोधात छावणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. नाशिकमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱय़ांनी सापळा रचून ही कारवाई केली.
संबंधित तक्रारदाराची मालेगाव तालुक्यातील झोडगे येथे शेतजमीन आहे. या जमिनीला बिगरशेती जमीन प्रमाणपत्र देण्याचे काम प्रांताधिकारी कार्यालयात प्रलंबित होते. त्यासाठीच तक्रारदाराकडे लाचेची मागणी करण्यात आली होती. बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रांताधिकारी कार्यालयातच लिपिकाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.